म्हसळा : प्रतिनिधी
सायबर फसवणुकीबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी रायगड पोलीस दालातर्फे जिल्ह्यांतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील खरसई गावाची निवड केली असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी दिली.घरफोडी आणि लुटमारीपेक्षा दरवर्षी सायबर फसवणुकीच्या घटना जास्त होत असतात. पीडित व्यक्तीने स्वत: ओटीपी दिला किंवा क्लिक करू नये, असे काहीतरी क्लिक केले की, रक्कम सायबर गुन्ह्यांमध्ये गमावली जाते. याचा आभ्यास केल्यास व सायबर गुन्हे कसे होतात हे जाणून घेतल्यास ते टाळता येऊ शकते. याचा अभ्यास करून रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्ह्यांत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमांतून ‘सायबर साक्षर सुरक्षित गाव’ मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उध्दव सुर्वे यानी वार्तालाप कार्यक्रमात दिली. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सोमजाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खोत, ज्येष्ठ सामाजिक नेते परशुराम मांदाडकर, खरसई ग्रामपंचायत सदस्य जगदीश खोत, बिना कातळकर, दीपाली कांबळे, जयश्री मांदारे, भारती शीतकर, आगरी समाज अध्यक्ष नामदेव खोत, बौध्द समाज अध्यक्ष अनिल कासारे, हरिश्चन्द्र कांबळे, माजी पोलीस पाटील काशिनाथ शीतकर, चंद्रकांत म्हात्रे, जनार्दन पयर, विजय पयर, दत्ताराम पयर, हायस्कुलचे मुख्याध्यापक मुलाणी सर, मराठी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी राठोड, उर्दू शाळेचे बंदरकर या वेळी उपस्थित होते.