Breaking News

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना

महाड : प्रतिनिधी

ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाण्याचे स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील विकासकामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पुरातत्व विभागाला लेखी पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला जातो. गेली दोन वर्षे हा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र यावर्षी निर्बंध शिथिल केल्याने श्री शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा होण्याची शक्यता आहे. गडावर येणार्‍या लाखो शिवभक्तांना या वेळी पिण्याच्या पाण्याची सुविधा गंगासागर आणि कोलिम तलावामधून केली जाते. या वर्षी तापमानात झालेली कमालीची वाढ यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वत्र डोके वर काढत आहे. गडावरील पाण्याचे स्त्रोतदेखील आटत चालले आहेत. त्यातच गडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरु आहेत. या कामांनादेखील याच तलावातून पाणी उपसा केला जात आहे.

किल्ले रायगडावर गंगासागर, हत्ती तलाव, बारा टाके, कोलिम तलाव, हनुमान टाके इत्यादी पाणी स्त्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलिम तलावमधील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी वापरले जाते. मात्र या तलावातील पाण्याची पातळी ऐन मे महिन्यात कमी होते. शिवाय शिवजयंती, शिवपुण्यतिथी यानिमित्ताने गडावर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची गर्दी असते. अशा वेळी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो.

हत्ती तलावाची गळती काढल्याचा दावा सध्या सुरु असलेल्या कामावरील यंत्रणेने केला होता. मात्र सध्या हत्ती तलावात पाणी उरलेले नाही. गडावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा गेली अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र ही नळ पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्याने आणि रायगड प्राधिकरणाच्या कामात नव्याने समाविष्ट झाल्याने नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे अन्य ठिकाणचे पाणी गंगासागरमध्ये आणणे किंवा इतर ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही.

दरम्यान, गडावरील विकासकामांना गंगासागरमधील पाण्याचा वापर करू नये अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पुरातत्व विभागाला केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र 29 एप्रिल 2022 रोजी देण्यात आले आहे.

  पुरातत्व विभागाला याची माहितीच नाही

किल्ले रायगड ज्यांच्या ताब्यात आहे, त्या पुरातत्व विभागाचे केअरटेकर राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र आपल्याकडे आलेले नाही असे सांगून याबाबत आपल्याला कांहीच माहिती नसल्याचे सांगितले. रायगडावर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता एक जबाबदार अधिकारी म्हणून पुरातत्व विभागाचे लक्ष असणे गरजेचे आहे. शिवभक्तांच्या सोयीसुविधांकडे केल्या जाणार्‍या दुर्लक्षामुळे पुरातत्व विभागाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply