कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी शनिवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिला.
सुनील गोगटे यांनी कर्जत विठ्ठलनगरमधील संपर्क कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कोंढाणे धरण होणार आहे. मात्र आजी-माजी आमदारांची श्रेयवादाची लढाई सुरू आहे. माजी आमदारांनी आपली भूमिका बदलली आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार लाड यांच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या बरोबर वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि प्रत्येकजण मीच धरण आणले असे भासवीत आहेत पण वस्तुस्थिती वेगळी आहे, असे गोगटे यांनी सांगितले.
कोंढाणे धरण 2010 साली 440 कोटी रुपयांमध्ये होणार होते मात्र काही महिन्यांनी ते 600 कोटी रुपयांवर गेले. ऑक्टोबर 2021 मध्ये या धारणाबाबत नवीन आराखडा आला आहे. त्यात हे धरण 1200 कोटी रुपये खर्चावर गेले आहे. बारा वर्षांपूर्वी आमच्या जमिनींमध्ये 20-25 फूट खड्डे खोदून धरणासाठी माती काढली. 2015 साली राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकर्यांना भुईभाडे द्यावे असे आदेश दिले होते. मात्र त्यातील एक छदामही कुणालाच मिळाला नाही. उलट 10-12 वर्षांचे पीक काढता आले नाही.
आता हे धरण होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. विकासाला आमचा विरोध नाही मात्र आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे शिवाय प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. आता तयार केलेल्या धरणाच्या आराखड्यात सिंचनाच्या पाण्याचा कुठेही उल्लेख नाही. धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी दिले पाहिजे, अन्यथा एक इंचही माती आम्ही काढू देणार नाही, असा इशारा गोगटे यांनी या पत्रकार परिषदेत दिला.