नागपूर ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागपूर मनपासह पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत असलेल्या कामठी, हिंगणा आणि वाडी येथेही हे लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सात दिवस लॉकडाऊन असणार आहे. 15 ते 21 मार्चदरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. या काळात सर्व खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील, मात्र दारूची ऑनलाइन घरपोच सेवा सुरू राहणार आहे, तर उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालये 25 टक्के उपस्थितीमध्ये सुरू राहतील, तसेच अत्यावश्यक सेवादेखील सुरू राहणार आहेत.
‘राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन’
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसंबंधी मोठे विधान केले आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे गुरुवारी (दि. 11) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. येत्या दोन दिवसांत प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस देण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.