आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी देशातील कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असे सांगताना केजरीवाल यांनी आपली आघाडी ही देशातील 130 कोटी जनतेशीच असेल असे फिल्मी उद्गार काढले आहेत. दिल्ली आणि पंजाब वगळता केजरीवाल यांच्या पक्षाला कुठेही लक्षणीय असे यश मिळालेले नाही. बहुतांश निवडणुकींमध्ये ते आपल्या उमेदवारांच्या अनामत रकमा देखील वाचवू शकलेले नाहीत. तरीही नागपुरात येऊन त्यांनी राणा भीमदेवी थाटात अशी घोषणा केली. वरकरणी पाहता केजरीवाल यांच्या उद्गारांमध्ये फारसे उत्सुकता वाढवणारे काहीच नाही. परंतु राजकीय अभ्यासक मात्र त्यांच्या उद्गारांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत सारेच विरोधी पक्ष चाचपडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचा झंझावात इतक्या सहजी रोखता येईल याबाबत आता कुणालाच खात्री उरलेली नाही. सर्व विरोधीपक्षांचे कडबोळे एकत्र बांधून भाजपच्या विजयरथाला लगाम घालण्याचे प्रयत्न गेल्या आठ वर्षांत अनेक वेळा झाले. परंतु दरवेळी ते अपयशी ठरले. सर्वात मोठा विरोधी पक्ष मानला जाणारा काँग्रेस पक्ष स्वत:च इतका समस्याग्रस्त आहे की त्यांना निवडणुकीच्या रणनीतीबद्दल नव्हे तर पक्षाच्या अवस्थेकडेच आधी लक्ष देणे भाग आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रचंड बहुमतानिशी सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकास कामांचा असा काही धडाका लावला की त्यांना आणि त्यांच्या पक्षाला रोखणे अशक्य होऊन बसले. 2019 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेच चित्र ठळकपणाने सामोरे आले. दोन वर्षांनंतर होणार्या निवडणुकीत देखील तेच कायम राहणार आहे अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत. सारांश एवढाच की मोदी सरकारचा पाडाव करणारी शक्ती आजमितीस देशभरातील कुठल्याही पक्षाच्या मनगटामध्ये नाही. त्यामुळे दोन वर्षांनंतर येणार्या सार्वत्रिक निवडणुकीत आपली रणनीती नेमकी काय असावी याचा विचार सारेच पक्ष करू लागले आहेत. अजुन तरी त्यांना उत्तर सापडलेले नाही. आम आदमी पार्टीने मात्र आपले धोरण स्पष्टपणे जाहीर करून आघाडी घेतली आहे असे म्हणता येईल. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आपल्या पक्षाची दिशा स्पष्ट केली. पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेथे आम आदमी पार्टीला भरीव यश मिळाले. त्यांच्याच पक्षाचे भगवंत मान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हे यश मिळवताना त्यांनी काँग्रेसला भुईसपाट केले. गोव्यातदेखील आपला फारसे यश मिळाले नाही तरी काँग्रेसची मते त्यांनी खाल्लीच. गुजरात विधानसभेच्या गेल्या निवडणुकीतही त्यांनी कळीची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर येणार्या काळात आम आदमी पार्टी काँग्रेसचे मनसुबे धुळीला मिळवणार हे लक्षात येते. भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्याची आपची कुवत नाही, ताकद देखील नाही. आपचे खरे भय काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनाच अधिक आहे, भाजपला नव्हे. आम आदमी पार्टीचा हा एकला चलो रे कार्यक्रम अखेरीस भारतीय जनता पक्षालाच साह्यभूत ठरेल असे दिसते. केजरीवाल यांनी 130 कोटी जनतेशी आघाडी करण्याची भाषा केली असली तरी त्यातील पोकळपणा उघडपणे दिसून येतो हे मात्र खरे.
Check Also
नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर
उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper