Breaking News

पनवेल महापालिका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि. १०) मनपा मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध आरोग्यसेवांचा आढावा घेतला. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करताना दर्जात गुणात्मक आणि परिणामकारक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
या सभेस महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते ॲड.प्रकाश बिनेदार, महापालिका सदस्य, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक शिवाजी पाटील हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक डॉ. जगन्नाथ वीरकर, सहाय्यक संचालक तथा पालक अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख तसेच इतर महापालिका सदस्य ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा अधिक गतिमान व बळकट करणे तसेच आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने या सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच वयोवंदन योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महापालिका क्षेत्रातील आदिवासीवाड्या आणि झोपडपट्टी परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड काढताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती देणारे फलक सर्वत्र लावावेत तसेच नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अधिकाधिक रुग्णालयांना या योजनांशी जोडून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक डॉ. जगन्नाथ वीरकर यांनी पनवेल महापालिकेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरोग्य क्षेत्रातील आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘पनवेल महानगरपालिका मॉडेल’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्येचा विचार करता नवीन आरोग्य केंद्र सुरू करणे गरजेचे असून त्यादृष्टीने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या वतीनेही प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन आरोग्य केंद्रांसाठी विविध माध्यमांतून विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित महापालिका सदस्यांनी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्देशाची माहिती उपस्थितांना दिली तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा व सुविधांची माहिती दिली. आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नागरिकांचा आणि समुदायाचा सहभाग अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सचिव क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड यांनी मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply