Breaking News

खोपोली न.प. कर्मचार्यांचा सोमवारपासून काम बंद आंदोलनचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

कामगारांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने नगर परिषद कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 23) पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर खोपोली शहरातील अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार आहे.

राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील कर्मचार्‍यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वेतन शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेळेवर द्यावे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची प्रलंबित देणी तात्काळ देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी, नगरपंचायतीमधील सर्व कर्मचार्‍यांचे सरसकट समावेशन करून कायम करण्यात यावे, नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांची जुनी सेवाही सेवानिवृत्ती व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी, समावेशनापूर्वी मयत व निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सर्व रोजंदारी कर्मचार्‍यांचे त्वरीत समावेशन करण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने 1 मेपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यात खोपोली नगरपालिकेचे कर्मचारीही (अत्यावश्यक सेवा वगळून) सहभागी झाले आहेत.

या आंदोलनाला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली. मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खोपोली नगर परिषदेच्या सर्व कर्मचार्‍यांनी सोमवारीपासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्याधिकारी अनुप दुरे यांना मागणी पत्र देऊन यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी केली आहे.

खोपोली नगरपालिकेचे सफाई कामगार मागील अनेक महिन्यापासून विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. अत्यावश्यक सेवा वगळून आंदोलनही सुरू केले आहे. मात्र नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारपासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्यात येईल.

-दिलीप सोनावणे, अध्यक्ष, स्थानिक कामगार युनियन खोपोली

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply