कर्जत : बातमीदार
महिला रायगड प्रीमियर लीग होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी तसेच प्रथितयश खेळाडूंचा खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले.
बेलापूर येथील सिडकोच्या भव्य मैदानावर दोन्ही सराव सामने खेळविण्यात आले. रायगड प्रिमियर लीगतर्फे उपल्ब्ध असलेल्या खेळाडूंमधून दोन संघ तयार करण्यात आले होते. सामन्यांसाठी पालकवर्ग आणि प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्याने खेळाडूंच्या उत्साहात भर पडली होती. मुंबई आणि नवी मुंबईतील नवोदित आणि नामांकित महिला खेळाडूचा भरणा या संघांमध्ये होता. प्रत्येक संघाने एक-एक सामना जिंकला.
महिला प्रीमियर लीगची घोषणा करण्यात आल्यानंतर आयोजकांतर्फे महिलांच्या संघ बांधणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा परिणाम या सामन्यांमध्ये पहायला मिळाला. मातब्बर संघाविरुद्ध सामना असूनही रायगडच्या लहान खेळाडूंचा मैदानावरील आत्मविश्वासपूर्ण वावर वाखाणण्याजोगा होता.
या सामन्यांसाठी विशेष निमंत्रित पाहुणे युवा खेळाडू चेतन त्रिवेदी यांनी रायगड प्रीमियर लीगतर्फे जिल्ह्यातील महिला क्रिकेटसाठी करण्यात येणार्या विशेष प्रयत्नांचे कौतुक कले आणि नियोजित
स्पर्धेला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासित केले. सामने आयोजनासाठी अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, प्रदीप खलाटे, सुरेंद्र भातिकरे, संदीप जोशी, प्रितम पाटील, हुसेन तांबोळी यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, समोर आलेला पावसाळा, प्रीमियर लीग आयोजकांतर्फे करण्यात येणारे काही सामने तसेच खेळातील आणखी बारकावे शिकणे आवश्यक असल्याने तूर्तास ही लीग स्पर्धा काही कालावधीनंतर आयोजित करण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …