मुख्यमंत्री व समर्थक आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांना दिलासा दिला आहे. या वेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यावर बोट ठेवत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.
शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले 10 महिने सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने जाहीर केला. या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही त्यांचे सरकार पुनर्स्थापित केले असते. याचार्च अर्थ उद्धव ठाकरेंनी घाईघाईत राजीनामा देऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला.
अखेर सत्याचा विजय झाला -मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अखेर सत्याचा विजय झाला. आम्हाला घटनाबाह्य म्हणणार्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य ठरवले आहे.
तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद केली होती -उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकमताचा आज विजय झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपण नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे सांगितले होते तसेच एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होते, तेव्हा त्यांनी नैतिकता कुठल्या डब्यात बंद केली होती, असा सवाल या वेळी केला.