आमदार नितेश राणे यांनी साधला निशाणा
नाशिक ः प्रतिनिधी
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मंगळवारी (दि. 7) मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता उद्धव ठाकरेंना सुनावले.
आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला जाब विचारणार आहे. मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत, पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी भीती वाटते की, सकाळचे औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत, असा टोला लगावला.
काश्मीरमधील हत्यांच्या मुद्यावरून होणार्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा. मुख्यमंत्री असताना आमदारांना कोंडून ठेवावे लागतं, यातूनच काय उगवलं आहे हे कळतं असा टोला लगावताना नितेश राणे यांनी काहीही दावा असला तरी 10 तारखेला काय ते स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.
नितेश राणे यांनी, या वेळी केतकी चितळे प्रकरणाचाही उल्लेख केला. शिवलिंग विटंबनाप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. हिंदूहृदयसम्राटांचा मुलगा मुख्यमंत्री असताना अशा पोस्ट केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात पोस्ट लिहिल्यास त्वरीत कारवाई केली जाते, पण या प्रकरणी अद्याप कारवाई नाही. हिच पोस्ट इतर धर्मियांबाबत असती तर दंगल घडली असती. पवारांवर कोणत्या तरी मुलीने पोस्ट केली तर तिला जेलमध्ये टाकलं. हिंदू आहोत म्हणून शांततेत मोर्चे निघत आहेत, असा इशारा यावेळी नितेश राणेंनी दिला.