पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगरसचिवांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 8 मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, 10 मे रोजी निवडणुका होऊन नव्या प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.
पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. या महापालिकेत 78 सदस्य आहेत. महापालिकेच्या मे 2017मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महापालिका क्षेत्रात अ, ब, क आणि ड अशा चार प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या. या प्रत्येक समितीत महापालिका क्षेत्रातील सात ते आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या समित्यांच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी पक्षात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. या समित्यांची निवड झाल्यावर काही काळ त्यांच्या दरमहा बैठकाही झाल्या नाहीत. सभापतींना कामाचा अनुभव नसल्याने त्यांना प्रभावशाली काम करता आले नसल्याचे सभापतींचे म्हणणे आहे. सहा महिन्यांनंतर या प्रभाग सभापतींना बसण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. त्यांना अनुभवी कर्मचारीही देण्यात आले नाहीत. त्यामुळे आपल्याला काम करण्याची पुरेशी संधी मिळाली नसल्याचे सध्याच्या प्रभाग समिती अध्यक्षांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या नगर सचिवांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्यामुळे आता सत्ताधारी पक्ष नवीन चेहर्यांना संधी देणार की जुन्यांचीच पुन्हा वर्णी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.