Breaking News

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचा सचिवाच्या विरोधात धिंगाणा; शेकाप नेते संतोष पाटील आणि किशोर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाका कारकून किशोर हरिभाऊ पाटील याला निवडणुकीची ड्युटी का लावली, असा जाब सचिव भरत रामदास पाटील यांना विचारून धमकावणारे शेकाप नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष हरिभाऊ पाटील आणि त्यांचे बंधू किशोर हरिभाऊ पाटील यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नाका कारकून किशोर हरिभाऊ पाटील आणि कृ. उ. बा. समितीचे संचालक संतोष हरिभाऊ पाटील हे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे आपल्याच भावाला आपल्याच समितीतील सचिवाने इलेक्शनची ड्युटी लावल्यामुळे संतापलेल्या संतोष पाटील यांनी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आकांडतांडव केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भरत रामदास पाटील यांना शेकाप नेते आणि कृ. उ. बा. समितीचे संचालक संतोष पाटील यांनी शिवीगाळ करून ‘तुला बघून घेतो. मी बाजार समितीचा संचालक आहे. तू बाजार समितीत नोकरीच कशी करतो तेच पाहतो’, असेही धमकावले.

किशोर पाटील यांनीही सचिव भरत पाटील यांना ‘तू मला मुद्दाम इलेक्शन ड्युटी लावली आहेस,’ असे सांगून शिवीगाळही केली. या दोन्ही पाटील बंधूंनी भरत पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या हातातील बाजार समितीच्या निवडणूक कर्मचार्‍यांची यादी हिसकावून घेत जमिनीवर

फेकून दिली.

या सर्व प्रकाराबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भरत रामदास पाटील यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संतोष आणि किशोर या पाटील बंधूंनी दिलेल्या धमकीबाबत आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात  कलम 353, 294, 504, 506 आणि 34प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply