Breaking News

पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती

जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील फार्महाऊसला पसंती देतांना दिसत आहेत. सध्या अशा फार्महाऊसचे बुकिंग जोरात आहेत.  जिल्ह्यात, कर्जत, नेरळ, खालापूर, सुधागड, माणगाव, अलिबाग, पेण आदी तालुक्यात हजारोंच्या घरात फार्महाऊस निर्माण झाले आहेत. यातील अनेक फार्महाऊस पावसाळी पर्यटनासाठी वापरले जातात. काही फार्महाऊस सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगांमध्ये आहेत. काही ऐतिहासिक किल्ल्यांच्या सानिध्यात, तर काही समुद्रकिनारी यामुळे पावसाचा व निसर्गाचा मनसोक्त आनंद सुरक्षितपणे घेण्यासाठी अगदी पुणे, मुंबईतील पर्यटकदेखील या फार्महाऊसना पसंती देतात. सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगानी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते. जुन महिन्यात पाऊस सुरू झाला की पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्याचे. मग त्यांची पाऊले आपोआप धबधबे, समुद्र किनारे, धरणे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे वळतात. येथील उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचे वातावरण हे सारे अनुभवण्यासारखे असते. पावसाळ्यात येथील अनेक ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेली असतात. मात्र काही दंगेखोर, दारुडे व अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागते. यासाठी मग जिल्ह्यातील समुद्र किनारे, झेनिथ, आषाणे, जुम्मापट्टी, बेडीसगाव, आडोशी, बोरगाव, पळसदरी आदी धबधब्यांवर, तसेच पाली भुतिवली, कोंडाणे, पळसदरी आदी धरणांवर पर्यटकांना बंदी असते. तसेच माणगाव तालुक्यातील देवकुंड येथेही काही दुर्घटना झाल्याने पर्यटकांना बंदी असते. यातील बहुतांश ठिकाणी कलम 144देखील लावले जाते. समुद्र किनार्‍यावररील स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीदेखील तीन महिने बंद करण्यात आल्या आहेत. अशावेळी मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे व सुरक्षित ठिकाणी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील फार्महाऊस हे आता पावसाळी पर्यटनाचे नवीन हब झाले आहेत,  सुधागड तालुक्यातील गौळमाळ येथील फार्महाऊसचे मालक संतोष बावधाने यांनी सांगितले. सुरक्षित फार्म हाउस आज कुटुंबाला अधिक पसंतीत आहेत असे पर्यटक म्हणतात. या मुळे स्थानिकांना रोजगारही मिळतो.

निसर्गरम्य परिसराचा घेतला जातो शोध

मित्र मैत्रिणी किंवा  कुटुंबासमवेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फार्महाऊसला जाणे अनेकजण पसंत करतात. येथील निसर्गरम्य वातावरण, जोडीला स्विमिंगपुलाची मज्जा, काही ठिकाणी असणारे वॉटर राईड, बगीच्यात फिरण्याचा आनंद, घरगुती, चुलीवरील व ग्रामीण भागातील लज्जतदार जेवण, कॅम्प फायरचा आनंद, भोवताली वाहणारे छोटे मोठे ओढे यात मनसोक्त जलक्रीडा करण्याची मज्जा, शिवाय राहण्याची किंवा थांबण्याची उत्तम व्यवस्था असते. परिणामी सुरक्षित व निर्विघ्नपणे पावसाचा, भिजण्याचा व खाण्याचा आनंद घेत पावसाळी पर्यटन पार पडते. यामुळे अशा फार्महाऊसला लोकांची अधिक पसंती आहे. शिवाय दिवसाला प्रतिव्यक्ती एक हजार ते दीड हजार रुपये खाण्यासाठी वगैरे घेतले जातात.

विविध सोयी सुविधा

अनेक फार्महाऊस विविध प्रकारे बनविलेले आहेत. बहुतेक ठिकाणी स्विमिंगपूल असते. काही ठिकाणी वॉटरअ‍ॅक्टिव्हिटी सुद्धा असते. वेगवेगळी झाडे, बगीचा, म्युझिक सिस्टिमची सोय, नाचतांना पाण्याचे कारंजे, सुरक्षित कृत्रिम पाण्याचा प्रवाह, खाण्याची योग्य व्यवस्था, तंबू, कॉटेज, बांबूची घरे, बैलगाडी सफर, आणि सभोवताली निसर्गाचे देखणे रूप अशा स्वरूपाचे विविध फार्महाऊस उपलब्ध आहेत.

पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात. मात्र सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती मिळत आहे. शहरातील पर्यटक आगाऊ बुकिंग करून ठेवतात. आलेल्या पर्यटकांना योग्य सोयी सुविधा देऊन पावसाळी पर्यटनाचा सर्वतोपरी आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

-सुजित बारसकर, संचालक, ठाकूर फार्महाऊस, सुधागड

 

पावसाळ्यात धोकादायक धबधबे, समुद्रकिनारे येथे जाण्यापेक्षा सहकुटुंब फार्महाऊसला जाणे पसंत करतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद देखील मिळतो व सुरक्षितदेखील राहता येते.

-प्रकाश मुद्राळे, पर्यटक, खारघर

 

-धम्मशील सावंत

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply