अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त
पनवेल : वार्ताहर
पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मोठी रांग पनवेल तालुक्यातील परिसरातील गाढेश्वर धरण, माची प्रबळ, मोरबे धरण कुंडी धबधबा, शांतीवन नदीपात्र, गाढी नदीकडे लागते. त्यामुळे यावर्षी 10 पोलीस अधिकारी आणि 19 अंमलदारांचा बंदोबस्त राहणर असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली आहे.
गाढेश्वर धरण, गाढेश्वर मंदिरच्या बाजूला, वाजे फाटा, कुंडी धबधबा टी पॉईंट, माची प्रबळ पायथा, वारदोली धबधबा, पोयंजे नानई बेकरीजवळ, मोरबे धरण आदि ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
माथेरान परिसरात पाऊस जास्त पडतो व गाढी नदीला अचानक पूर येतो. त्यामुळे अनेकदा पर्यटकांचा या पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. गाढी नदी ही खडकाळ आहे. त्यामुळे यावर डोके आपटून व जखमी होऊन पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरण परिसरात एका-दुसर्याचा मृत्यू होतो. पोलीस सर्वांना सावधानतेचा इशारा देतात. मात्र याकडे पर्यटक कानाडोळा करतात. त्यामुळे पोलिसांनी या ही वर्षी धरण परिसरात जाण्यास बंदी घातलेली आहे.
पावसाळा नुकताच सुरू झाल्याने धरणाच्या परिसरात पाणी शिल्लक नाही त्यामुळे पर्यटकांची सध्या वर्दळ कमी आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूंनी डोंगराच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे हजारो पर्यटक धरण परिसरात आकर्षक होतात. याच ठिकाणी मद्यपान करतात. त्यामुळे या पाहण्याचा मोह आवरत नसल्याने पर्यटक पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एखाद दुसर्याला आपला जीव येथे गमवावा लागतो. जनतेच्या जीवाची आणि सुरक्षिततेसाठी जबाबदारी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे मात्र तरीदेखील अनेक पर्यटक चोरवाटा शोधून धरणाच्या आणि धबधबा परिसरात जातात.
धबधबे, धरण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून धबधब्याजवळ पर्यटक पोहोचू शकतील अशा सर्व मार्गांवर पोलीस लक्ष ठेवून आहे. जर कोणी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- 2,नवी मुंबई
पर्यटकांनी पावसाळी पर्यटन ठिकाणी येऊ नये, परिसरातील बंगले मालक,फार्म हाऊस मालक यांच्याकडे येणारे पाहूणे नदीच्या पात्रात गेले नाही पाहिजेत. त्यांची जबाबदारी मालकाची राहील. त्यांना नदीच्या पात्रात जाण्यास मज्जाव केला पाहिजे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला तर बंगले आणि फार्म हाऊस मालक जबाबदार असतील.
-रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका