उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नेरे गावातील सायली श्याम ठाकूर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून प्रथम आली असून तिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. सायलीच्या उत्तुंग यशाबद्दल बुधवारी (दि. 20) पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या या सन्मान सोहळ्यावेळी निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, सहाय्यक निरीक्षक भोईर, सायली ठाकूर हिचे कुटुंबीय, पोलीस ठाण्यातील अधिकारीवर्ग आदी उपस्थित होते. सायलीच्या यशाबद्दल तिच्यावर पनवेल, नवी मुंबई सह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सायलीच्या या यशाबद्दल तिचे वडील श्याम शंकर ठाकूर, आई उषा श्याम ठाकूर, बहिण शामली भगत व भाऊ उज्वल ठाकूर यांच्यासह गुरुजन व संपूर्ण कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. सायलीचे वडील नोकरी करीत असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे शासकीय सेवेत अधिकारीपदी नियुक्ती झालेली सायली ही तिच्या कुटुंबातील व पनवेलच्या ग्रामीण भागातील पहिलीच मुलगी आहे.
सायलीने शासकीय अधिकारी व्हावे असे तिच्या आईवडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सायलीने एमपीएससीची तयारी सुरू केली. आई वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या बहिणीकडून प्रेरणा मिळाली असून आज खर्या अर्थाने कष्टाचे चीझ झाल्याची भावना सायलीने व्यक्त केली.