नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी, असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करू शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले. मागच्या आठवड्यात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यामुळे देशात पाकिस्तानबद्दल प्रचंड रोष आहे.
भारतानेसुद्धा इस्त्रायलसारखे धोरण अवलंबून कारवाई करावी, अशी मागणी सर्व थरातून होत आहे. इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करू. दहशतवाद हा फक्त भारत आणि इस्त्रायलचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची समस्या आहे, असे मल्का यांनी सांगितले. 52 वर्षीय मल्का इस्त्रायली लष्करात कार्यरत होते. कर्नल पदावर असताना ते लष्करातून निवृत्त झाले होते. भारत इस्त्रायलचा महत्त्वाचा सहकारी त्याचप्रमाणे जवळचा मित्र असल्याचे आपल्याला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितल्याचेही मल्का म्हणाले.