Breaking News

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे मंगळवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
यावेळी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या दिवाळी अंकांना पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील, प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दिवाळी अंकांच्या परंपरेला प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान केला जात असून या सोहळ्याला साहित्यप्रेमी, लेखक, पत्रकार, संपादक आणि दिवाळी अंक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply