Breaking News

नवी मुंबईत लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ

नवी मुंबई : बातमीदार

सानपाडामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये विशेषत: लुटमारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होवू लागल्याने सानपाडा पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता सानपाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तीन भामट्यांनी एका महिलेला लुटल्याची घटना घडल्याने पोलिसांविषयी सानपाडावासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तीन भामट्यांनी सानपाडा सेक्टर 7 मधील बिकानेरपासून एका महिलेला ढकलत ढकलत चौधरी मेडिकलजवळ आणले. तिथे रस्त्यावरच एका कोपर्‍यात महिलेला बसवून तिच्याकडील आठ तोळे सोने व सहा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेत पलायन केले. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी मिलेनिअमसमोरच सकाळी 7 वाजता एका महिलेला धमकावत तिच्याकडील दागिने हिसकावत दोघा भामट्यांनी पलायन केले होते. सानपाडा सेक्टर 7 परिसर भुरट्या चोरांचा माहेरघर बनत असून महिलांना लुटण्याच्या घटना याच परिसरात घडल्या आहेत. दिवसाढवळ्या गेल्या काही दिवसांपासून महिलांना लुटण्याच्या घटना घडत असताना चोरांचा शोध घेण्यास सानपाडा पोलिसांना अपयश आले आहे. भाजपचे सानपाडा नोडमधील पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात सानपाडा नोडमधील वाढत्या गुन्ह्यांबाबत यापूर्वीच निवेदन सादर करत चिंता व्यक्त केली आहे.

बसमध्ये दागिने चोरणारा गजाआड

पनवेल : पनवेल एसटी आगारातील बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून महिलांचे दागिने चोरणार्‍यास अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहे. पनवेल एसटी आगारात एक महिला मुंबई बोरिवली येथे जाण्यासाठी आपल्या पतीसह बसमध्ये चढत असताना आरोपी कुणाल सुनील गायकवाड (रा. वांद्र्याच्या पाडा, अंबरनाथ) व त्याचा साथीदार पंकज (रा. बदलापुर) यांनी त्यांच्याकडे असलेल्या कटरच्या सहाय्याने सदर महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कट केली व ती बांगडी घेऊन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार रवींद्र राऊत, नाईक परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, विनोद देशमुख, रवींद्र पारधी, शिपाई विवेक पारासुर, प्रसाद घरत आदींच्या पथकाने सापळा आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा सहकारी पसार झाला आहे. याबाबत आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

म्युझिक सिस्टमसह गाडीची चोरी

पनवेल ः खारघर सेक्टर 12 आणि 18मध्ये अज्ञात चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून म्युझिक सिस्टीमची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली सात वाहने फोडली तसेच एक गाडीही चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खारघर परिसरात भाड्याने राहणार्‍या वाहनमालकांना सोसायटीत पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. सोसायटीबाहेर वाहने उभ्या असलेल्या अशाच सात वाहनांच्या काचा एकाच वेळी फोडण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी वाहनातील म्युझिक सिस्टीम आणि इतर काही वस्तू चोरून नेल्या आहेत, तसेच खारघरमधील भूमिका हेमंत वाडकर यांची घरासमोर उभी केलेली गाडीही चोरट्यांनी नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply