महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने तालुक्यातील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्यातील औषधांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यांत अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी महाड तालुक्यातील पशूधन पालकांकडून केली जात आहे. महाड तालुक्यात जिल्हा परिषद आणि राज्य शासनाचे पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. पावसाळ्यात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार होत असतात. मात्र गावातील दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाड तालुक्यात प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुवैद्यकीय अधिकार्यासह त्यांचे सहकारी अशी पदे मंजूर आहेत. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने हे दवाखाने बंद राहत आहेत. महाड तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र जनावरांना वेळीच आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नाईलाजास्तव शेतकर्यांना आपल्या गुरांवर खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागत आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये गोचीडांचे औषध, जंताचे औषध, चाटण गोठा, कॅल्शियम पावडर इत्यादी औषधे नसल्यामुळे पशुपालन करणार्यांसमोर ही औषधे कुठून आणायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने तालुक्यात असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना एकाहून अधिक दवाखान्यांना भेट द्यावी लागते. शिवाय बहुतांश दवाखाने मालकीचे नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.
-डॉ. एम. एस. लोंढे, पशुधन विकास अधिकारी, महाड
महाड तालुक्यातील शेतकर्यांच्या पशुधनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांचा उपयोग होत होता, मात्र सध्या या भागात डॉक्टरांअभावी पशुवैद्यकीय दवाखाने बंद राहत आहेत यामुळे खाजगी डॉक्टरांना बोलवावे लागत आहे. यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
-श्रीराम खोपकर, अमोल धाडवे, शेतकरी, महाड