पोलादपूर : प्रतिनिधी
महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या पोलादपूर शहरानजिकच्या रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी धरणाचे सहा सांडवे आणि सर्व्हिस गेट खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी मे 2022 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आता वेगाने वाढ झाली आहे. रानबाजिरे या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा 121.84 मीटर्स आहे. धरणातील पाणीसाठा 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर तर 55 मीटर पातळीवर 16.49 दशलक्ष घनमीटर असतो. मृतसाठा 3.6 दशलक्ष घनमीटर असून 61.50 पातळीवर वापरण्यायोग्य पाणीसाठा 26.32 दशलक्ष घनमीटर आणि 55 मीटर पातळीवर पूर्ण संचय पातळी 61.50 मीटर आहे. सांडव्यांची पातळी 55 मीटर आहे. भिंतींची पातळी 64.70 मीटर आहे. धरणाची महत्तम उंची 33.615 मीटर असून पाणलोटक्षेत्र 197.257 चौ.कि.मी इतके आहे. या धरणामुळे 2.70 चौ.कि.मी. बुडीत क्षेत्र झाले आहे. सांडव्यांची क्षमता 3248.134 घनमीटर प्रतिसेकंद एवढी आहे. सध्या येथील पाण्याची पातळी 51.50 मीटर एवढी असून 43 आरएलपर्यंत पाण्याची पातळी खाली करण्याची परवानगी आहे. मात्र, यावर्षी धरणाच्या बॅकवॉटरची पातळी 43 आरएलपेक्षाही कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून शनिवारी सकाळपासून सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी 22 मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद 25946 घनमीटर पाणीसाठयाचा विसर्ग होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानबाजिरे येथील धरणामध्ये गेल्या वर्षी 22 जुलै 2021 रोजी चक्क 57.60 मीटर एवढी पाण्याची पातळी वाढून धोक्याच्या 58 मीटरच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची वेळ आली होती. त्या अनुषंगाने मे महिन्यापासूनच बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास सुरूवात करण्यात आली. आता संपूर्ण बॅकवॉटरचा जलाशय रिकामा करण्याच्या हेतूने सुरू झालेले प्रयत्न किमान चार दिवसरात्र सुरू राहिल्यास रानबाजिरे धरण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा नव्याने भरण्यास सुरूवात होईल आणि पोलादपूर येथील सावित्री नदीपात्रातून महाडच्या दिशेने जाणारे पाणी कमी वेगाने जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे.