गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आम्ही घडलो आणि शैक्षणिक कार्याची व दातृत्वाची प्रेरणा घेतली. अण्णांचा शैक्षणिक कार्याचा वसा समृद्ध करण्यासाठी माझ्या उत्पन्नातील वाटा सढळ हाताने मदत करताना आनंदच होतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 24) केले.
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये 135वा कर्मवीर जयंती सोहळा व जनार्दन आत्माराम भगत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यार्थ्यांनी चांगले काम करीत राहिले पाहिजे, तर आपल्याला चांगले फळ मिळते हे सांगतानाच आयुष्यात माणसाकडून चुका होतात, परंतु चुकांमधून जो शिकतो तोच खरा माणूस. वारंवार चुका करणारा माणूस हा वाया गेलेला माणूस ठरतो, असे परखड विचार करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्त दरवर्षी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्टे नेते कै. जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येते तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मातोश्री भिमाबाई जगन्नाथ भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही बक्षिसे दिली जातात. यंदाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल वाय. टी. देशमुख यांचा तसेच तसेच आपले आजोबा हरी गणा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून एक लाख रुपयांच्या कायम ठेव ठेवल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक वसंतशेठ पाटील यांचा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त दिला जाणारा रायगड विभागीय आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा वर्तक आदींचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, महेंद्र घरत आणि कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी.पवार आदींची भाषणे झाली. पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगून कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्मीत कुंदन मोकल व इयत्ता नववीची विद्यार्थिनी दीक्षा वर्तक यांनीही कर्मवीर अण्णांच्या जीवनावर अत्यंत ओघवत्या भाषेत माहिती दिली. विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांनी अहवाल वाचन व प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, शाळा समितीचे सर्व सदस्य, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, शरद खारकर, वसंतशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, हरिश्चंद्र म्हात्रे, सुधीर ठाकूर, चंद्रकांत भोईर, किशोर पाटील, राजेंद्र देशमुख, भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे नूतन जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख यांनी पुढील वर्षांपासून एसएससी परीक्षेत विज्ञान विषयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अनुक्रमे पाच, हजार तीन हजार व दोन हजार रुपयांची बक्षिसे दरवर्षी देण्याचे जाहीर केले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्मीत कुंदन मोकल या विद्यार्थ्याच्या भाषणावर सभागृह अचंचित झाले. या विद्यार्थ्याच्या भाषणाचे कौतुक करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याला इयत्ता दहावीपर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये (प्रतिमाह 1000 रुपये) अशी शिष्यवृत्तीच या वेळी जाहीर केली. विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे, प्रमोद कोळी व रवींद्र भोईर आणि लेखनिक चंद्रकांत मढवी यांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर आणि उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले, तर लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी यांनी आभार मानले.