Breaking News

बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली

शिंदे गटात दाखल; सेवेकरी मोरेश्वर राजेंचाही पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे आणि एकेकाळी ‘मातोश्री’मधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या चम्पासिंग थापा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सोमवारी (दि. 26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही या वेळी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे. त्या वेळी त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. ‘मातोश्री’मधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले.

जी चूक 2019ला व्हायला नको होती ती तुम्ही दुरुस्त करीत आहात. बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेईल त्याच्याबरोबर सदैव राहील, असे सांगत चम्पासिंग थापा यांनी बाळासाहेबांच्या आणि हिंदूत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply