आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध केली आहे.
नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दूरवस्था झाली होती. येथील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणच्या रहदारीचा विचार करता उड्डाणपुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा पूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भर पावसात पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवल्यावर सिडको बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता हे आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही दोन महिन्यांत टेंडर प्रोसेस सुरू करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते, पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले, तर काहीजण रस्त्यावर झोपले.
अखेर सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले असून सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवारपर्यंत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवडाभरात या पुलाच्या चारही बाजूंचे काँक्रिटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिले. त्यानंतरच भरपावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते, मात्र जर येत्या आठवडाभरात हे काम झाले नाही, तर आमच्यासाठी आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला दिला होता. त्या अनुषंगाने सिडकोने न्यू पनवेल आरओबी येथे डेक स्लॅबच्या रिसरफेसिंगसह जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे या शीर्षकाखाली दोन कोटी 48 लाख 69 हजार 839 रुपयांचे काम करण्यात येणार असून बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत.
नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे अपघातांना आमंत्रण होते. त्यामुळे या संदर्भात आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आम्ही कधीही मागे पडत नाही. त्यामुळे भर पावसात आंदोलन करताना आम्ही कदापिही माघार घेतली नाही. शेवटपर्यंत सिडकोचे अधिकारी योग्य कार्यवाहीची भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन करीतच राहिलो. त्या अनुषंगाने या आंदोलनाला यश आले. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिडकोचे आभार मानतो.
-संदीप पाटील, उपाध्यक्ष, पनवेल शहर भाजप