Breaking News

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान

रायगडात सरपंचपदांसाठी 37, सदस्यपदांसाठी 298 उमेदवार रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) मतदान होत आहे. थेट सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 37, तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानदेखील सज्ज झाले आहे.
जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली होती, पण अलिबागमधील कोप्रोली येथे सदस्य निवडीसाठी एकच अर्ज आला. त्यामुळे येथे थेट सरपंचपदासाठी आणि सदस्य निवडीसाठी मतदान होणार नाही. पेणमधील कोपर आणि श्रीवर्धनमधील आदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक होणार नसली तरी सदस्य निवडीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी 19 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होईल.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 184 सदस्यपदांसाठी आलेल्या अर्जांपैकी 419 वैध ठरले. त्यातून 121 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 298 उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी 63 वैध उमेदवारी अर्जांपैकी 26 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 37 उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या नावावर किंवा चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करून भवितव्य आजमावित आहेत. स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत. त्यामुळे युती-आघाड्यांची गणिते ग्रामपंचायतनिहाय निरनिराळी असलेली पहायला मिळत आहेत.
अलिबागेत शेकापची प्रतिष्ठा पणाला
अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या दोन  ग्रामपंचायतींमध्ये एकास-एक अशी चुरशीची लढत होत आहे. वेश्वी ग्रामपंचायत शेकापकडे आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचे वेश्वी येथे  निवास्थान आहे. त्यामुळे वेश्वी ग्रामपंचायत जिंकून आमदार जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी करीत आहेत, तर नवेदर-नवगाव हाही शेकापचा बालेकिल्ला, पण येथे मागील 15 वर्षे प्रशासक आहे. बर्‍याच वर्षांनी येथे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. वेश्वी आणि नवेदर नवगाव या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शेकापचे आमदार जयंत पाटील विरुद्ध शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी अशी टक्कर दिसून येते.

मतदान होणार्‍या ग्रामपंचायती
अलिबाग : वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत : पोटल, पाली तर्फे कथल खलाटी, खालापूर : चौक, आसरे, लोधिवली, तुपगाव, पनवेल : खेरणे, पेण : कोपर, पोलादपूर : तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाड : खरवली, माणगाव : देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द, श्रीवर्धन : आदगाव.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply