Breaking News

भात खरेदीसाठी 38 केंद्रांना मान्यता

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

भात खरेदी-विक्रीसाठी रायगड जिल्ह्यात 38 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यातील निवडक केंद्रांवर सोमवारपासून भाताची खरेदी सुरू होईल. या वर्षी भातकापणी संपण्यापूर्वीच खरेदी-विक्री केंद्र सुरू होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात हेच पीक प्रामुख्याने घेतले जात असल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून भात खरेदी केव्हा सुरू होईल याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना होती. सध्या हळव्या वाणातील भातपिकांबरोबरच निमगरवी वाणातील सर्व भातपिकांची कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. खरेदी केंद्रात भात विक्रीसाठी नेण्यापूर्वी त्यातील आर्द्रता जास्तीत जास्त 17 टक्के असणे आवश्यक असते, परंतु पावसामुळे धान्यात आर्द्रता असल्याने ते सुकवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. पेण, अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीत अद्याप पाणी असल्याने येथील कापणी संथगतीने सुरू आहे, तर रोहा, मुरूड, महाड या तालुक्याच्या डोंगराळ भागातील कापणी पूर्णत्वास आल्याने शेतकर्‍यांची भाताच्या विक्रीची लगबग सुरू आहे. भाताला दिल्या जाणार्‍या आधारभूत किमतीत राज्य सरकारने गेल्या वर्षापेक्षा 50 रुपयाने वाढ करीत 2040 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च काढून किमान नफा होण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.

भात खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना होत्या. त्या अनुषंगाने सर्व तयारी झाली आहे. धान्य भरण्यासाठी गोण्या, साठवण्यासाठी गोदामे तयार आहेत, परंतु दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे धान्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने भात खरेदीस विलंब होत आहे. बोनसच्या संदर्भात अधिवेशनात निर्णय होऊ शकेल.

-के. बी. ताटे, अधिकारी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …

Leave a Reply