अलिबाग : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश सईदा शेख यांनी आरोपीला बुधवारी (दि. 30) सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला.
अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात 2 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील पीडिता ही तिच्या मित्रांसह रविवारच्या सुट्टीमध्ये फिरायला आली असताना तेथे आरोपी आपल्या साथीदारांसह फिरायला आला होता. त्याने पीडिता व तिच्या मित्रांजवळ जावून स्वतःची ओळख करून दिली व त्याने पीडितेच्याजवळ जावून मला अॅटिट्युडवाली मुलगी आवडते असे म्हणून तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला व इतर साथीदारांनी पीडितेकडे बघून अश्लिल हावभाव करुन वेगवेगळे आवाज काढले व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
यावर पीडितेने अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नोंदविली. सदर केसचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. भिसे व त्यांच्या सहकार्यांनी केला. खटल्यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी तीन महत्वाचे साक्षीदार तपासले तर शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी चार साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर अॅड. स्मिता धुमाळ-पाटील यांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला.
खटल्यात भादविसं. 354 प्रमाणे न्यायालयाने आरोपीस दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार 500 रुपये दंड तसेच पोक्सो कलम 19 व 12 प्रमाणे सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार 500 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.