Breaking News

खारघर शहराची विकासाकडे वाटचाल

नव्या सरकारची दमदार कामगिरी

खारघर : रामप्रहर वृत्त

पनवेल पालिका झाल्यानंतर खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतर करण्यात आली आहे, पण मागील दोन वर्षाच्या कमकुवत सरकारच्या काळात सिडकोने शहराच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आता मात्र सत्ता हस्तांरणामुळे सरकारचे सर्वच विभाग वेगाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच नवीन वर्षात सिडकोकडून खारघरमधील कॉर्पोरट पार्क, नव्याने विकसित होत असलेला गोल्फ कोर्स, नवी मुंबई मेट्रोसारखे विविध प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतर झाली असली तरी खारघर सेक्टर 22 ते 33 हा परिसर सिडकोच्या ताब्यात आहे. अशातच खारघरमधील पांडवकडा, गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क शेजारील 150 हेक्टर मोकळ्या जमिनीवर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर सिडकोकडून कॉर्पोरेट पार्कचे काम केले जाणार आहे. यासाठी जागतिक पातळीवरील वास्तुविशारदांकडून आराखडा मागवून नवीन वर्षात कार्पोरेट पार्कच्या कामाला अधिक गती देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. या कॉर्पोरेट पार्कच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने 10.7 हेक्टर जमिनीवर चार फुटबॉल स्टेडियम तयार केले आहेत; तर हाकेच्या अंतरावर साडे तीन एकर जागेवर रग्बीचे मैदान विकसित केले जाणार आहे. याचबरोबर सिडकोकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ मैदान विकसित करण्यात येत असून 2023 मध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. सहा महिन्यांत बेलापूर-खारघरमार्गे धावणार्‍या नवी मुंबई मेट्रोचे काम वेगाने सुरू असून मे अखेरपर्यंत नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते पेंधर मार्गावर धावेल या दिशेने काम सुरू आहे. शिवाय खारघर टेकडीवर खारघर हिल टाऊनशिप उभारण्याचा सिडकोचा प्रयत्न सुरू असून काही दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या परिसराचे महत्त्व उद्योजकांना पटवून दिल्याचे समजते. त्यामुळे येणार्‍या 2023 या नवीन वर्षात विविध प्रकल्प मार्गी लागणार असल्यामुळे खारघरचे नाव जगाच्या नकाशावर जाणार यात शंका नाही.

भाजपची महत्त्वाची भूमिका

भारतीय जनता पक्षाचा खारघर शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार आहे. कारण खारघरमध्ये सर्व नगरसेवक भाजपचे असून त्यांनी शहरातील नागरी विकासकामांवर जास्तीत जास्त भर दिला. वेळोवेळी सिडको, पालिका तसेच संबधित विभागाकडे समस्या मांडून त्या सोडविण्यात येत असतात. यासोबतच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील समस्या, अडीअडचणी रोखठोकपणे मांडून त्या प्रशासनाकडून सोडवून घेत असतात. त्यामुळेच स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींचीही खारघर शहराचा विकासात महत्त्वाची भूमिका आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply