Breaking News

प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी राजिपचा पुढाकार

प्रत्येक तालुक्यात उभारणार प्लास्टिक संकलन केंद्र

अलिबाग : प्रतिनिधी
वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या साहाय्याने प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचर्‍यावर पूर्णप्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्लास्टिक कचर्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून आगळा-वेगळा उपक्रम गावपातळीवर सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपैकी तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 15 ग्रामपंचायतींची निवड जिल्हा परिषदेने केली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात संबंधित ग्रामपंचायतींव्यतिरिक्त आजूबाजूच्या ग्रामपंचायतींमधील प्लास्टिक कचरा जमा करण्यात येईल.
प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून गावे, वाड्यांच्या परिसरात असलेल्या प्लास्टिक कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांगावात जनजागृती करून कचरा मुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील गावे प्लास्टिक कचरा मुक्त होण्यास मदत होणार आहे.
चौकट ः
प्लास्टिक संकलन केंद्राची ठिकाणे
प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील चेंढरे, माणगाव-निजामपूर, कर्जत-पाषाणे, उरण-चाणजे, पनवेल-पालीदेवद, मुरूड-काशिद, तळा-बोरघर हवेली, श्रीवर्धन-दिवेआगर, म्हसळा-खामगाव, रोहा-नागोठणे, महाड-बिरवाडी, खालापूर-तांबाटी, पेण-वडखळ, सुधागड-परळी, पोलादपूर-कापडे बुद्रुक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply