Breaking News

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग

नागपूर : प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. 28) नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर महानगर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके आदी उपस्थित होते.
बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करेल. भाजपच्या स्थापना दिनी 6 एप्रिल रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहोत.
महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणार्‍या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी, असे आव्हान आपण त्यांना दिले होते, मात्र हे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेचे विभागवार प्रमुख मुंबईसाठी आमदार अमित साटम, ठाणे-कोकण आमदार निरंजन डावखरे, आमदारनितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र आमदार जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा आमदार संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ आमदार प्रवीण दटके, आमदार विजय रहांगडाले, पश्चिम विदर्भ आमदार संजय कुटे, प्रदेश महामंत्री आमदार रणधीर सावरकर हे असणार आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply