Breaking News

रायगडात पावसाअभावी भातरोपे करपण्याची भीती

रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी
जून महिना संपायला आला तरी पाऊस बरसायचे नाव घेत नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे रायगडमधील शेतकरी चिंतातूर आहे. भातरोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. या रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. पाऊस झाला नाही तर केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात साधारण एक लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मशागतीची कामे आटोपून भाताची पेरणी केली जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार्‍या पावसामुळे एव्हाना भाताची रोपे वर येऊन काही ठिकाणी लावणीची कामेदेखील सुरू होत असतात, परंतु जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.
मे अखेरीस पेरलेल्या भाताला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींचा आधार मिळाला. त्यामुळे दाण्याला फुटवा होऊन रोपे आता पाच ते सहा इंचापर्यंत वर आलेली आहेत, तर काही ठिकाणी पुरेसे पाणी न मिळाल्याने फुटलेला दाणा वाया गेला आहे. आता जी रोपे वर आली आहेत त्यांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे, परंतु मान्सूनचा पत्ता नाही शिवाय मान्सूनपूर्व सरीदेखील थांबल्या आहेत. शेते कोरडी पडली आहेत. पुढील दोन-तीन दिवसात पाऊस झाला नाही तर ही रोपे करपून जातील अशी स्थिती आहे.
काही शेतकर्‍यांनी भाताच्या रोपवाटिकेला बाहेरून पाणी द्यायला सुरुवात केली आहे. विहिरींवर पंप बसवून किंवा बोअरवेलच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे, परंतु विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलचे पाणीदेखील आटले आहे. त्यामुळे हा प्रयोगदेखील यशस्वी होताना दिसत नाही. दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकरयांना दुबार पेरणी करावी लागण्याची भीती आहे.

आम्ही मे महिन्यातच धूळपेरणी करून मोकळे झालो. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. अजून पावसाचा पत्ता नाही. वर आलेली रोपे करपायला सुरूवात झाली आहे. परत पेरणी करायची तर बियाणेदेखील शिल्लक नाही. पावसाची वाट पाहणे एवढेच आमच्या हातात आहे.
-उदय गायकवाड, शेतकरी

जिल्ह्यात साधारणपणे 30 टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. पावसाअभावी रोपे करपण्याची शक्यता आहे, पण दोन-तीन दिवसांत कोकणात मान्सून सक्रीय होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तोवर रोपे जगविण्याचा प्रयत्न करावा.  ज्यांनी पेरणी केली नाही त्यांनी पावसाची वाट पहावी.
-उज्ज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक रायगड

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply