माणगाव : प्रतिनिधी
गस्तीवर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी चालक यांच्यावर तीन अनोळखी पुरुष व एक महिला अशा चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना माणगाव तालुक्यातील वाढवण येथे बुधवारी (दि. 18) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात दोघे पोलीस जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर चारही आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर शिवाजी कावळे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व पोलीस कर्मचारी असलेले चालक उद्धव टेकाळे असे दोघे बुधवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. त्यांना पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास एका मॅक्झिमो पिकअप गाडीचालकाने आपल्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. या घटनेची खात्री करण्याकरिता कावळे व टेकाळे गेले असता वाढवण गावच्या शेतातील घरासमोर अनोळखी तीन पुरुष व एक महिला यांनी फिर्यादी त्यांचे सरकारी कर्तव्य बजावत असताना त्यांना शिवीगाळ करून लोखंडी सळई, चप्पल व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच कावळे यांचा मोबाइल व सरकारी बेल्ट हिसकावून घेऊन गेले. यामध्ये दोघांनाही दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी तत्काळ माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले व कर्मचार्यांना कळविले. त्याप्रमाणे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चारही आरोपी फरार झाले होते. या घटनेतील जखमी पोलीस अधिकारी व कर्मचार्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यात पोलीस अधिकारी व कर्मचार्यावर जीवघेणा हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 307, 353, 327, 332, 333, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.