पनवेल महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय कामे सुरू
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या चारही प्रभागामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी चारही प्रभागातील रस्त्याचा आढावा घेऊन तातडीने यावरती उपाययोजना करण्याबाबत संबधित विभागास सूचना दिल्या आहेत.
यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापर्यंत चारही प्रभागामध्ये महापालिकेने जवळपास 2.51 किमी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले, त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू शहरातील नवीन पनवेल, कामोठे, खारघर व कळंबोली नोडमध्ये एप्रिल ते मे या कालावधीत महानगर गॅस मार्फत सुमारे 29.70 कि.मी. लांबीची गॅस वाहिनी टाकण्याकरीता रस्त्यामध्ये खोदकाम करण्यात आले. या परवानगी देताना महापालिकेने त्यांच्याकडुन रस्ते पुर्नस्थापित (दुरुस्त) करणेसाठी शुल्क जमा करून घेणेत आले आहेत. या गॅस वाहिन्याची कामे मे अखेर पर्यंत सुरू होती. त्यानंतर रस्ते दुरुस्ती सुरू करण्यात आली. दुरुस्तीचा पहिल्या टप्यात खोदलेल्या चरांमध्ये खडीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर डांबरीकरण करणेत येणार आहे. गॅस वाहिन्यांच्या कामाव्यतिरिक्त ज्या ज्या भागात खड्डे पडले आहेत, त्या त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स तसेच इतर पध्दतीचा अवलंब करून तातडीने खड्डे बुजवण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिली आहे. त्याप्रमाणे चारही प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी उपाययोजना
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरणाचे काम करणे शक्य नाही. या कालावधीत वाहतुक सुरळीत राहावी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून खडीकरण व पेव्हर ब्लॉक्सच्या सहाय्याने रस्ते दुरुस्ती सुरू राहणार आहे. तसेच खोदण्यात आलेल्या चराचे पावसाळ्यानंतर 15 ऑक्टोबरनंतर डांबरीकरणामध्ये काम करण्यात येणार आहे.