Breaking News

भूसुरुंग स्फोटाने घरांच्या भिंतींना भेगा

पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणात धमाके

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कशेडी घाटामधील चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या भूसुरुंगाने परिसरात हादरे बसून अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटात मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजल्यापासून एल अँड टी या ठेकेदार कंपनीची ब्लास्टिंग व बोअरिंग करणारी वाहने आणि उपकरणे धामणदेवी आणि चोळई गावाच्या सीमेवर मोठ्या संख्येने जमा झाली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांना त्यांच्या सहकार्‍यांसह पाचारण करण्यात आले. या वेळी जिलेटिन आणि स्फोटकांच्या साहाय्याने प्रचंड मोठा भूसुरुंग स्फोट करण्यात आला. चोळई गावातील ग्रामस्थ भूकंप झाल्याच्या भीतीने आपापल्या घराबाहेर मोकळ्या जागेमध्ये आले. आवाजाच्या दिशेने काही तरुण मोटरसायकलींवरून गेले. तेथे ब्लास्टिंगचे मटेरियल वापरून रिकामे झालेले खोके एका डंपरमध्ये  भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. ग्रामस्थांनी त्याला विरोध केला असता ठेकेदार कंपनीचे अभियंते व कर्मचार्‍यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधवदेखील निघून गेले.

कशेडी घाटातील डोंगर वीस-वीस फूट खोल बोअर खणून त्यामध्ये स्फोटके भरून भूसुरुंग स्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटामुळे चोळई गावातील अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे आणि भेगा पडलेल्या दिसून आल्या. याबाबत ग्रामस्थांनी माहिती देताच तहसीलदार दीप्ती देसाई आणि तलाठी खेडकर यांनी घटनास्थळाची आणि चोळईतील घरांच्या भिंतींना गेलेले तडे आणि मोठ्या भेगांची पाहणी केली.

 संपूर्ण परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत आपण जिल्हधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही तहसीलदार दीप्ती देसाई यांनी या वेळी ग्रामस्थांना दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply