Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रातील 1000 मुलींना मिळणार सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ

आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार

पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023मध्ये जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या खूप सार्‍या फायदेशीर योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना आहे. या माध्यमातून आई-वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तिचे भविष्य आत्मनिर्भर व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. मुलींना सन्मानाने जगता यावे, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा एक प्रमुख हेतू यामागे मानला जातो.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात 1 जानेवारी ते 23 जुलै 2023दरम्यान जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः या मुलींचे एक हजार रुपये भरून नवीन खाते उघडणार आहेत. त्यानंतर संबंधित पालकांना आपल्या मुलीच्या खात्यावर दरमहा रक्कम भरल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी या बचतीचा लाभ घेता येणार आहे. 2023मध्ये जन्मलेल्या आपल्या सुकन्येचे समृद्ध भविष्यासाठी अमरीश मोकल यांच्याकडे 9821882007 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 24 तास 365 दिवस सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारे नेतृत्व आहे. जनसामान्यांचे नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रातील एक हजार मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या खात्यात एक हजार रुपये आम्ही भरणार आहोत. त्यामुळे पालकांकडून तिच्या भविष्यासाठी बचत नक्कीच केली जाईल. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

Check in today and rehearse the fresh BetMGM Missouri added bonus password

BetMGM Missouri Extra Code WSNSPORTS Countries $1,500 for Gonzaga against Kentucky BetMGM Missouri promotion code …

Leave a Reply