आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झालेली असून मुंबई, नवी मुंबई शहरालगत असल्याने तसेच विमानतळ व परिसरातील औद्योगिकरणामुळे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिका क्षेत्राची प्रती माणसी 150 लिटर या मापकाप्रमाणे दैनंदिन स्थुल गरज 394 दशलक्ष लिटर असून 2057पर्यंत 847 दशलक्ष लिटर असणार आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रास देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको, नवी मुंबई महापालिका (मोर्बे धरण) व एमआयडीसी यांच्याकडून सुमारे 224 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तथापि, वाढती लोकसंख्या विचारात घेता भविष्यात त्यामध्ये फार मोठी तुट येण्याची शक्यता आहे. ही तुट भरून काढण्यासाठी दुर्देवाने पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवण्याच्या पर्यायाशिवाय अन्य पर्याय दृष्टिपथात नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले आहे.
महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी वाढविल्याने पाणी संचयात मोठी वाढ होऊन त्याच्या वापर सुलभरीत्या व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून होणार आहे. देहरंग धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात व त्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदीसंदर्भात आयुक्त-पनवेल महापालिकेने आपल्याकडे 9 जानेवारी 2025 रोजी एक प्रस्तावही सादर केला आहे. त्या अनुषंगाने देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी 20 मीटरने वाढविणे व त्यासाठी 294 हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, मात्र नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper