Breaking News

साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी

असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्त
आगामी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासारख्या मोठ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना कायदेशीर नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याची संधी द्यावी तसेच नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस प्रशासनाकडून होणारी कठोर कारवाई थांबवून सहकार्याची भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी साऊंड, लाईट, ट्रस्ट, जनरेटर, एलईडी स्क्रीन ओनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी गांभीर्याने दखल घेतली असून लवकरच पोलीस उपायुक्त, असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सल्लागार निलेश सोनावणे उपस्थित होते.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार पनवेल परिसरातील सुमारे २०० ते ३०० स्थानिक भूमिपुत्र साऊंड, लाईट, जनरेटर, एलईडी स्क्रीन आदी व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. एका व्यावसायिकाच्या माध्यमातून मालक, कामगार, डीजे ऑपरेटर, टेम्पो चालक यांच्यासह सुमारे पाच ते सहा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हा व्यवसाय केवळ मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नसून अनेक स्थानिक कुटुंबांच्या रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे, मात्र सध्या उच्च डेसिबल आवाजाचे कारण देत पोलीस प्रशासनाकडून थेट साहित्य जप्त करणे, मोठ्या प्रमाणात दंड आकारणे तसेच गुन्हे दाखल करण्यासारखी कारवाई केली जात असल्याने स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विशेषतः सण-उत्सवांचा हंगाम हा या व्यावसायिकांसाठी वर्षातील महत्त्वाचा व्यवसायाचा काळ असतो. अशा वेळी होणाऱ्या कारवाईमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होत असल्याचे असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे.
कायदेशीर नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तातडीने गुन्हे दाखल करणे अथवा साहित्य जप्त करण्याऐवजी प्रशासनाने प्रथम समज, सूचना आणि आवश्यक ते मार्गदर्शन करून सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून किमान दोन बेस आणि दोन टॉप साऊंड सिस्टिम वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात तसेच स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांच्या रोजगाराशी संबंधित या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली.
निवेदन देतेवेळी साऊंड, लाईट, ट्रस्ट, जनरेटर, एलईडी स्क्रीन ओनर्स असोसिएशनचे मंगेश कांडपिळे, सचिन काळे, जतेश म्हात्रे, सुहास सूर्यवंशी, रवी पगडे, महेश ठाकूर, प्रतीक बाणे, अमर पाटील, केतन फडके, शशिकांत मुंडकर, अभिषेक दमडे, कुशल बहिरा, तेजस दळवी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply