चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे ते खास वैशिष्ट्य. चित्रपटाच्या पोस्टरवरही त्या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढायला हवी. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटाबाबत तसं दिसते.
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाबाबतही असेच दिसते. हा चित्रपट मुंबईत १६ ऑगस्ट १९८५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच त्याच्या प्रदर्शनास एकेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत. यात आणखी एक फिल्मी योगायोग असा, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ मुंबईत १५ ऑगस्ट १९७५ रोजी मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि बरोबर दहा वर्षांनी त्याच मिनर्व्हा चित्रपटगृहात राम तेरी गंगा मैली प्रदर्शित झाला आणि पब्लिकने पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी एन्जॉय केला.
मला आठवतंय मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकाना याच मिनर्व्हा चित्रपटगृहाची पहिल्या दिवशीच्या पहिल्या खेळाची तिकिटे दिली होती आणि चित्रपट रसिकांसोबत चित्रपट पाहण्याचा अनुभव दिला होता. आर. के. फिल्म निर्मित चित्रपटांचे आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे खेळ चेंबूर येथील आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये दाखवत असा माझा अनुभव. ती प्रथा बाजूला ठेवून आम्हा चित्रपट समीक्षकाना जनसामान्यांसोबत हा चित्रपट दाखवावा हा निर्णय या चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख बनी रुबेन यांचा असावा असे बरेच दिवस मला वाटत होते. काही महिन्यांनी बनी रुबेन यांनीच सांगितले, तो निर्णय रणधीर कपूरचा होता. त्यामुळे १४९९ अशी अतिशय विशाल आसन क्षमता असलेल्या भव्य दिव्य आणि मिनर्व्हा चित्रपटगृहात मुंबईतील आम्ही सर्वभाषिक मिळून तीस सिनेपत्रकार होतो. त्यातील अनेकांनी ‘हा चित्रपट राज कपूरच्या क्लासचा नाही’ अथवा ‘या चित्रपटात राज कपूरच्या दिग्दर्शनातील आवारा, बरसात, मेरा नाम जोकरचा टच दिसत नाही’ असं म्हटलं. हा चित्रपट समिक्षकाना फारसा आवडला नाही, प्रेक्षकांना मात्र आवडला आणि या चित्रपटाने मिनर्व्हा चित्रपटगृहातच पन्नास आठवड्याचा खणखणीत मुक्काम केला. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वाधिक मोठे चलनी नाणे. तेच महत्व देते, तेच ग्लॅमर देते.
राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि चित्रपट प्रसार माध्यमे यांत या नावावरुन काहीसं अचंबित व्हायला झाले होते. रणधीर कपूरने एका ठिकाणी गंमतीत म्हटले, राज कपूर पौराणिक चित्रपट बनवत आहेत.
राज कपूर चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यांची अतिशय उत्तम जाण असलेला फिल्मवाला. त्यानं उगाच का, राम तेरी गंगा मैली असं आपल्या चित्रपटाचे नाव ठेवले असेल? या चित्रपटात राजीव कपूर नायक असणार हे निश्चित होते. पण नायिका कोण हा फारच कुतुहल वाढवणारा प्रश्न होता. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाची नायिका हा कधीही सरळ साधा सोपा विषय नव्हता. फार उत्सुकता वाढत असे आणि अनेक नावे चर्चेत असत. गॉसिप्स मॅगझिनमधून त्यांवर रंगवून खूलवून वाढवून शिजवून लिहिलं जाई. आणि एके दिवशी नाव आलं, मंदाकिनी. ही कोण? तर उत्तर प्रदेश येथील मेरठ येथील एक युवती. राज कपूरचे फाईड आहे ना, म्हणजे निवड अगदी परफेक्ट असणार याची खात्री. हा राज कपूरमधील दिग्दर्शकावरचा विश्वास होता. राज कपूरची
हीदेखील एक मिळकत आहे.
चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या बातम्या येऊ लागल्या. फोटोही आले. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बातम्या आल्या. असं करत करत दिवस पुढे सरकत सरकत होते आणि १९८५ च्या मध्यास दोन गोष्टी घडल्या. राम तेरी गंगा मैली चित्रपटाची ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफित प्रकाशित झाली आणि राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे गीत संगीत दर्जेदार असतं याचा सकारात्मक प्रत्यय आला आणि गाणी ऐकता ऐकता लोकप्रिय झालीदेखिल. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातील गाणी हा एक स्वतंत्र असा कौतुकाचा विषय. गाण्याच्या माध्यमातून पटकथा पुढे सरकत असे.
राम तेरी… चित्रपटाचे संगीतकार रवींद्र जैन. या चित्रपटातील सर्वाधिक सुपरडुपर हिट गाणं सून सायबा सून हसरत जयपुरी यांनी लिहिले आहे. मै हू मै हू हे गाणे अमीर कजलबाग यांनी लिहिले आहे. उर्वरित गाणी रवींद्र जैन यांची आहेत. तुझे पुकारे ये मेरी बाहे, एक दुखियारी करे, राम तेरी गंगा मैली हो गयी, एक राधा एक मीरा, यारा हो यारा, हुस्न पहाडो का….असे प्रत्येक गाणे लोकप्रिय. रणधीर कपूरने कपिल शर्मा शोमध्ये एकदा असे सांगितले, राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील गाणी अगोदर लिहिली गेली, त्याला चाली बांधल्या आणि मग त्यावरून पटकथा संवाद लिहिले. हे केवळ आणि केवळ जबरदस्त प्रतिभा असेल तर आणि तरच साध्य होते. या चित्रपटाचं लेखन राज कपूर, के. के. सिंग, वसंत साठेसाहेब आणि ज्योती स्वरुप यांचे आहे. कला दिग्दर्शन सुरेश सावंत यांनी केले आहे आणि छायाचित्रणकार राघु कर्माकार आहे.
हा चित्रपट पूर्ण झाला आणि चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा एक वैशिष्ट्यपूर्ण फंडा म्हणून आम्हा सिने पत्रकारांना या चित्रपटातील तीन फोटो पाठवले गेले. धबधब्याच्या पायथ्याशी बसलेली चिंब चिंब झालेली मंदाकिनी, राजीव कपूर आणि मंदाकिनी यांचे चुंबन दृश्य आणि मंदाकिनी एका तान्हुल्या बाळाला घेऊन बसली आहे. त्या काळात हे फोटो धाडसी ठरले. यावरुन उलटसुलट चर्चा रंगली. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील झीनत अमानचे ग्लॅमरस रुपडे पुन्हा एकदा चर्चेत आले. कोणी राज कपूरला शो वुमन असेही म्हटले. चित्रपट प्रदर्शनाचा दिवस अगदी जवळ आला आणि या चित्रपटातील अन्य प्रसंगांची छायाचित्रे आम्हा सिनेपत्रकाकडे आली. मिनर्व्हा चित्रपटगृहात वरच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतच्या लांबलचक थियेटर डेकोरेशनमध्ये ती तीनही बहुचर्चित फोटो गोष्टी होत्याच. चित्रपट सुपर डुपर हिट होताच त्या प्रसंगाची आवश्यकता दिसून आली. राज कपूरमधील निर्माताही अतिशय चतुर होता हे यातून दिसलं.
राज कपूर या नावातच बरेच काही ‘इस्टमनकलर’ असं सामावलयं. ब्लॅक अँड व्हाईट ते रंगीत असाच त्याचा शो रिल (पडद्यावरचा) आणि रिअल रिल (वास्तवातला) प्रवास आहे. ज्याचा शोध कधीच संपणार नाही. पृथ्वीराज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी व शशी कपूर यांचा मोठा भाऊ,
(कालांतराने पित्याची जबाबदारी) अभिनेता, प्रगल्भ निर्माता, कल्पक दिग्दर्शक, दृश्य माध्यमाची जाण असलेला संकलक, अनेक अभिनेत्रींचा सखा (सोबती), गीत संगीत व नृत्याचा जबरा जाणकार,
(राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गाणी हा स्वतंत्र विषय आहे), आर. के स्टुडिओचा मालक (‘बरसात’च्या यशानंतर त्याने चेंबूरला स्टुडिओ उभारला. ‘आवारा’तील स्वप्नदृश्य याच स्टुडिओत चित्रीत झाले), दूरदृष्टी असलेला आणि त्याच वेळेस ‘रुपेरी स्वप्न पाहणारा’, ग्लॅमरचा तडका, गॉसिप्सचा राजा, रुढी परंपरा पाळणारा (आर. के. स्टुडिओतील होळी, श्रीगणेशोत्सव) अशा अनेक गोष्टींची केमिस्ट्री असलेला अस्सल फिल्मवाला.’राज कपूर’ या नावातच वलय आहे. राज कपूरच्या बहुस्तरीय वैशिष्ट्यांमुळे जगप्रसिद्ध ‘टाईम’ मॅगझिनने जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकात राज कपूरला वरचे स्थान दिले.
१९८८ ची गोष्ट. आपल्या देशातील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार नवी दिल्लीतील सोहळ्यात राज कपूरने स्वीकारल्याची बातमी वृतसंस्थेवर आली आणि काही वेळातच बातमी आली, राज कपूरला कार्यक्रम स्थळीच त्याचा दम्याचा विकार बळावला, त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्या मे महिन्यात जवळपास रोजच राज कपूरच्या तब्येतीविषयी काही बातमी असे. (चॅनेलपूर्वीचे ते युग होतं. ब्रेकिंग न्यूज हा शब्द जन्माला आला नव्हता.) राज कपूरला उपचारासाठी मुंबईत आणले गेले अशा काही बातम्यांमुळे वृत्तपत्र कार्यालयात एक विषय चर्चेत आला, राज कपूरवरचे लेख, फोटो यांची तयारी करुन ठेवावी काय? तेव्ही मुद्रित माध्यमात हाताने हेडिंगचे खिळे लावणे, मजकूर कंपोझ करणे (लायनो हा प्रकार होता), फोटोचा ब्लॉक बनवणे, पान लावून घेणे अशी मोठी प्रक्रिया असतानाच ही तयारी किती दिवस टिकेल हाही प्रश्न होताच. महिन्याभरात ते पान मोडावे लागले आणि गुरुवार दिनांक २ जून १९८८ रोजी संध्याकाळनंतर वृतसंस्थेने बातमी दिली, शोमन राज कपूरचे निधन.
‘जोकर’ हा राज कपूर अभिनित/निर्मित/दिग्दर्शित महाखर्चिक चित्रपट म्हणून गाजत असतानाच दोन मध्यंतरनी प्रदर्शित झाला. मला आठवतय, ग्रॅन्ट रोडच्या नॉव्हेल्टी थिएटरवरील ‘जोकर’चे सर्कसचे अतिशय भव्य दिमाखदार डेकोरेशन पाह्यला आम्हा भावडांना वडिलांनी आवर्जून नेले होते. चित्रपट संस्कृतीची बहुस्तरीय ओळख होण्यातील ही एक छोटीशीच गोष्ट. पण लक्षात राहणारी.आठवड्याभरातच रसरंगमध्ये बातमी आली, काही दृश्ये कापून ‘जोकर’ एका मध्यंतरचा करण्यात आला…. ‘जोकर’ पडला की पाडला यावर पानभर लेख होता. आजही यावर लिहिलं जातेय हे एक प्रकारचे यशच. राज कपूरचा ‘संगम’ ( १९६४) असाच दोन मध्यंतरचा चित्रपट यशस्वी ठरला.
राज कपूरचे जुने चित्रपट पाहण्यासाठी तेव्हा ‘गल्ली चित्रपट’ ही संधी. जिस देश मे गंगा बहती है, श्री ४२०, सपनों का सौदागर हे तेथेच पाहिले. मॅटीनी शोला अनाडी, चोरी चोरी पाहिले, अशातच दूरदर्शन आले आणि जागते रहो, छलिया, आवारा पाह्यले. चित्रपट पाहत जाताना ‘कलाकारामधील अष्टपैलुत्वा’ची ओळख होत जाते…. आणि ‘बॉबी’ (१९७३) आला. रोमॅन्टीक वादळच आले. राज कपूरचा कायमस्वरुपी सर्वात तरुण चित्रपट म्हणजे ‘बॉबी’ हे आजही तो पुन्हा पुन्हा पाहताना दिसतेय. आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढीने मोबाईलवर यू ट्यूबवर हा चित्रपट पाहिला तरी ‘पिक्चरमधला टवटवीतपणा’ तोच.
राज कपूर हे एक जबरदस्त रसायन आहे याची ओळख होण्याचा योग ‘बॉबी’ने दिला. या प्रेमपटात राजा (ऋषि कपूर) मिसेस ब्रगेन्झा ( दुर्गा खोटे) याना भेटायला त्यांच्या वस्तीत जातो तेव्हा बेल दाबल्यावर बॉबी (डिंपल कापडिया) दरवाजा उघडते तेव्हा तिच्या डाव्या हाताला लागलेले चणा पिठ ती बटा सरकवताना त्या बटांना लागते हे अगदी अस्सेच राज कपूर व नर्गिसच्या खऱ्याखुऱ्या पहिल्या भेटीत घडल्याचे किस्से गाजू लागले. खऱ्या आयुष्यातील गोष्टी चित्रपटात वापरण्याचे ते विशेष कौशल्य होते.
नर्गिस राज कपूरची हुकमी नायिका, तो विवाहित असूनही ते दोघे एकमेकांकडे आकृष्ट झाले. राज कपूरची अधिक ओळख होण्याच्या गोष्टी अनेक. ‘संगम ‘च्या वेळेस वैजयंतीमालात राज कपूर गुरफटत गेल्याच्या कथा- दंतकथा अनेक. राज कपूरमधील कल्पक दिग्दर्शक आपल्या चित्रपटातील ‘अभिनेत्रीं’मधील गुणवत्ता व सौंदर्य (याचा क्रम कसा होता हे राज कपूर जाणे) पडदाभर खुलवायचा हे झीनत अमान (सत्यम शिवम सुंदरम), मंदाकिनी (राम तेरी गंगा मैली) वगैरेतही दिसले. चित्रपट टेबलावर घडतो, त्याचे पटकथा लेखन व संकलन ही या माध्यमाची ताकद असे राज कपूर मानायचा हे त्याच्या कलाकृतीत दिसते. माझा श्वास, माझं स्वप्न, माझं जीवन चित्रपट आहे, हे राज कपूरचे एका मुलाखतीतील बोल त्याच्या व्यक्तिमत्वाची एक ओळख झाली.
आर. के. फिल्मचे बोधचिन्ह यातही राज कपूरमधला दिग्दर्शक दिसतो. ‘बरसात’मधील राज कपूर व नर्गिस यांच्या एका उत्कट प्रणय पोझमधून हे बोधचिन्ह जन्माला आले. या जोडीने आर. के. फिल्म आणि अन्य निर्माते व दिग्दर्शक यांच्या एकूण सोळा चित्रपटात एकत्र भूमिका साकारलीय. ‘आवारा’मध्ये त्याने वेगळी थीम हाताळली. संस्कार म्हणजे काय? ते अनुवांशिक असतात की आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा त्यावर प्रभाव असतो? याभोवती ही गोष्ट होती.
‘श्री ४२०’मध्ये राज कपूरवरील चार्ली चॅप्लीनचा प्रभाव दिसतो. तत्कालिक चित्रपट अभ्यासकांच्या मते, या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. या चित्रपटात सामाजिक, आर्थिक विषमता दिसते. यातील पदवीधर नायक बेरोजगार आहे. पण प्रामाणिक आहे. त्याच बक्षीस त्याला मिळतेही. काही काम मिळेल अशा अपेक्षेने तो शहरात येतो. येथे त्याला काही वास्तव अनुभव येतात. एके ठिकाणी रस्त्यात भीक मागणारा माणूस त्याला धक्का मारुन म्हणतो, बाजूला हो माझ्या धंद्याची वेळ झाली आहे. नायकाला हा अनुभव अनपेक्षित असतो. नोकरीच्या शोधात शहरात येणाऱ्यांचे शोषण करणारे शहरात आहेत हे या चित्रपटात अधोरेखित होते. आपल्या समस्या, प्रश्न, विवंचना सोडवण्यासाठी जनसामान्यांनी एकत्र यायला हवे हे हा चित्रपट सांगतो. या चित्रपटातील नायिका (नर्गिस) नायकाला सांगते, अप्रामाणिकपणाच्या पैशातून प्रामाणिकपणाचे पदक सोडवणं गैर आहे. हा चित्रपट स्वातंत्र्योत्तर समाजाचे स्वप्नभंग दाखवणारा चित्रपट म्हणून आजही ओळखला जातो.
राज कपूरने आर. के. फिल्म या बॅनरखाली काही चित्रपट निर्माण केले, त्या चित्रपटातही राज कपूरचा सामाजिक जाणीवेचा प्रभाव दिसतो. प्रकाश अरोरा दिग्दर्शित ‘बूट पॉलिश’ सामाजिक भान राखणारा. शंभू व अमित मिश्रा दिग्दर्शित ‘जागते रहो’मध्ये नववास्तववादाची छाया आहे. एका घोटभर पाण्यासाठी मुंबईत रात्रभर दारोदारी फिरणारा खेडवळ नायक हे मध्यवर्ती कथासूत्र. राघु कर्मकार दिग्दर्शित ‘जिस देश मे गंगा बहती है’चा नायक (राज कपूर) साधाभोळा आहे. दरोडेखोरांचे ह्रदय परिवर्तन हे याचे कथासूत्र.
‘संगम’ हा आर. के. फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट. यात दोन मित्रांची (राज कपूर व राजेंद्रकुमार) घट्ट मैत्री आहे, प्रेमाचा त्रिकोण आहे (वैजयंतीमाला) आणि त्याच वेळेस याचमुळे दोन मित्रांत पडलेली दरीदेखील आहे. एक मोठाच कॅनव्हास यात आहे. ‘संगम’ने राज कपूरला शोमन उपाधी लागली. राज कपूरच्या चौफेर प्रवाहातील हा महत्वाचा फंडा. ‘जोकर’ हा कायमच चर्चेत असलेला चित्रपट. कधी यशापयशाची तर कधी गुणवत्तेची चर्चा होते. राज कपूरचे स्वप्न अशा टॅगलाइनने चित्रपट रसिकांसमोर आला. सत्यजित राय यांनी
‘जोकर’बद्दल म्हटलं होतं, पौगंडावस्थेतील राजूची कथा सांगणारा पहिला भागच दाखवून जरी राज कपूर थांबला असता तरी चाललं असतं. राय यांनी या भागासाठी राज कपूरची तुलना रनुआ या फ्रेंच दिग्दर्शकाशी केली. खरंतर हास्य आणि कारुण्य अथवा खेळकरपणा आणि दु:ख यांचे मिश्रण घेऊन ‘जोकर’ आला.
‘जोकर’च्या व्यावसायिक अपयशातून राज कपूर बदलला हे ‘बॉबी’ सर्वच स्तरावर दाखवतो. ‘सत्यम शिवम सुंदरम’देखील प्रेमकथाच. पण जास्त चर्चा झीनत अमानच्या शरीर सौंदर्याची रंगली. राज कपूरमधील दिग्दर्शकावर शोमनने मात केली असेच म्हटले गेले. ‘प्रेम रोग’ हा पुन्हा त्याच्या मूळ शैलीची गोष्ट असणारा चित्रपट. विधवा पुनर्विवाहाचा मुद्दा यात राज कपूरने मांडलाय. राज कपूर हे स्वतंत्र चित्रपट स्कूल आहे. स्वतः राज कपूर चित्रपती व्ही. शांताराम यांचा प्रचंड आदर करत असे.
मनमोहन देसाईंच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘छलिया’मध्येही त्याने भूमिका साकारली. आणि आपला पुत्र रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’ आणि ‘धरम करम’ या चित्रपटातही भूमिका साकारली. तेथे त्याने दिग्दर्शनीय सूचना अंमलात आणल्या. आपल्या देशातील सिंगल स्क्रीन थिएटर्सपासून सोविएत युनियन, चीन, इराण, मध्य पूर्वेतील देश असा सगळीकडे राज कपूर ‘हीरो’ झाला. ‘आवारा ‘ने राज कपूरला विदेशात ओळख दिली. बीबीसी दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवला गेला. भारतातील सर्वोत्कृष्ट शंभर चित्रपटात ‘आवारा’चा समावेश होतो. हे ‘दिग्दर्शक राज कपूरचे यश’. हाच राज कपूर संजय खान दिग्दर्शित ‘चांदी सोना’, ‘अब्दुल्ला’ अशा चित्रपटात भूमिका कशी बरे साकारतो अशा प्रश्नांवर राज कपूरचे म्हणणे असे, अशा वेळी आपल्यातील दिग्दर्शक सेटबाहेर ठेवतो.
‘राज कपूर’ या संस्थेबाबत कितीही जाणून घ्यावे तेवढे थोडेच. आपले पिता पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये सर्व प्रकारची कामे करीत या क्षेत्रात पाऊल टाकले. कधी तो रंगमंचावरील विदूषक असे तर कधी ‘दीवार’ नाटकातील नोकर व पडदे ओढणारा बॅकस्टेज आर्टिस्ट असे. राज कपूर ही एका सरळ रेषेत जाणारी कथा, पटकथा व संवाद नाही. हाच रोमान्सचा राजा दो उस्तादमध्ये मधुबालाचा , दीवानामध्ये सायरा बानूचा, दुल्हा दुल्हनमध्ये साधनाचा, सपनों का सौदागरमध्ये हेमा मालिनीचा (तिचा हा पहिलाच चित्रपट). राज कपूरला संगीताचा कान, दृष्टी (म्हटलं तर श्वासही) होता हे अनेक गाण्यातून ऐकायला आणि पाह्यला मिळते. राज कपूर स्वतः माऊथ ऑर्गन, तबला वाजवण्यात कुशल होता. पुण्यावर त्याचे विशेष प्रेम. लोणीला त्याने शेतजमीन खरेदी करुन ‘राज बाग’ निर्माण केली. त्यात एक मिनी थिएटरही होते. सत्यम शिवम सुंदरममधील पुराचा प्रसंग येथेच चित्रीत झाला.
या सगळ्या प्रवासात राज कपूरने ‘हीना’ या प्रेमकथेचे स्वप्न पाहिले होते. दोन गाण्यांचे रेकॉर्डिंगही केले. पण त्यानंतर राज कपूरचे निधन झाल्याने रणधीर कपूरने ‘हीना’चे दिग्दर्शन केले. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये
‘हीना’ दाखवला. केदार शर्मा दिग्दर्शित ‘नीलकमल’ या चित्रपटापासून कारकीर्द सुरु केलेला ‘राज कपूर’ अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून घडला, जगला. आपल्या स्टुडिओतील होळीच्या रंगापासून ते आपल्या चित्रपटाचे पोस्टर कसे असावे याची कल्पक आखणी करण्यापर्यंत हा बहुस्तरीय प्रवास आहे. मी मीडियात आल्यावर राजीव कपूरची भूमिका असलेल्या ‘जिम्मेदार’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या पार्टीत पहिल्यांदा राज कपूरचे लाईव्ह दर्शन घेतले तेव्हा प्रचंड गोरागोमटं असं हे प्रचंड प्रतिभा असलेले व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षात पाहतोय हे क्षणभर खरंच वाटेना.
मी मीडियात असल्यानेच मला असे अनेक एक्सक्लुझिव्ह सुखद योग आले आणि त्यातच एक राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा अनुभव आला आणि ज्यांचे चित्रपट लहानपणापासून पडद्यावर पाहत मोठा झालो त्या राज कपूरच्या आर. के. स्टुडिओ या ऐतिहासिक वास्तूतही अनेकदा
तरी जाण्याचा सुखद योग आला.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper