Breaking News

सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

यश प्राप्तीसाठी प्रामाणिक व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक -डॉ. देवानंद शिंदे

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 3) करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
समारंभास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सानवी देशमुख यांच्यासह सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील आणि तिन्ही विद्याशाखांचे आणि विविध विभागांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भाषणात सीकेटी महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन मिळाल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी, भविष्यात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक राहिले पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर कारणे सांगणारी माणसे मोठी होत नाहीत आणि मोठी माणसे कारणे देत नाहीत, असे सांगून तंत्रज्ञानाच्या जोरावर यश प्राप्त करता येते. म्हणून भविष्यात संशोधन, तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. संस्थेचे कौतुक करताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही प्रत्येकाला संधी मिळण्याचे ठिकाण आहे, असे त्यांनी नमूद केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात, प्रत्येक विद्यार्थ्यांने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे, असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थांना ही पदवी घेऊन शांत राहू नका, तर पुढच्या पदव्यादेखील प्राप्त करा, असे सांगून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. एस.के. पाटील यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. या वेळी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र तसेच विद्यावाचस्पतीप्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर.व्ही. येवले यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. येवले, प्रा. ए.व्ही. पाटील व डॉ. गीतिका तंवर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार परीक्षा नियंत्रक डॉ. एस.आय. उन्हाळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उन्हाळे, विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. एम.ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी.डी. आघाव यांनी परिश्रम घेतले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply