आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर
पनवेल : रामप्रहर वृत्त
तपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या प्रयोगशाळेची स्वतंत्र समिती नेमुन चौकशी करण्यात येईल आणि कारवाईही केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात मृत उंदीर आढळलेल्या प्रकारावरील प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. याप्रश्नावर ना. आदिती तटकरे यांनी उत्तर दिले.
रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणार्या मल्टीमिक्स सिरीयल्स अॅण्ड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटमध्ये मृत उंदीर आढळून आला असल्याचे जानेवारी 2025 निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून भविष्यात अशा घटनांना आळा घालणेसह यास जबाबदार पोषण आहार पुरवठा कंपनीविरोधात कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल झाला होता. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली.
या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणार्या मल्टीमिक्स सिरीयल्स अॅण्ड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटमध्ये मृत उंदीर आढळून आल्याची बाब अंशतः खरी आहे. अंगणवाडी सेविका यांना घरपोच आहार वाटप करताना मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीनचे एक पाकीट कडक लागल्याने सदर पाकीट अंगणवाडी केंद्रामध्ये उघडण्यात आले. त्यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी तत्काळ तेथे भेट दिली. हे पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये मृत अवस्थेत प्राणी सदृश अवशेष आढळून आले. त्यामुळे पुढील आहार वाटप तात्काळ थांबवण्यात आला. तसेच, ज्या लाभार्थ्यांना आहार वाटप केला होता त्यांचा आहार अंगणवाडी सेविकेमार्फत अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करून घेण्यात आला. जमा करून घेण्यात आलेल्या आहारापैकी आहाराचा नमुना सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसमोर पंचनामा करून हडपसर-पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठविण्यात
आला होता. या अहवालानुसार घरपोच आहार खाण्यास योग्य आहे. तसेच संशयास्पद मृत अवस्थेत प्राणी सदृश अवशेष असलेल्या आहाराचे पाकीटदेखील तपासणीसाठी हडपसर-पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, परंतु सदर प्रयोगशाळेने सदरचा नमुना तपासणीसाठी स्विकारला नाही. त्यामुळे 29 जानेवारी 2025 रोजी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे सदर नमुना तपासणीकरता पाठविण्यात आला, परंतु त्या ठिकाणी देखील आहार नमुना तपासणीसाठी स्विकारला नाही.
वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील वाटप झालेला घरपोच आहार ताब्यात घेवून पुन्हा नव्याने घरपोच आहाराचा पुरवठा करण्यात आलेला आहे. संबंधित पुरवठाधारकास सदर पुरवठ्याबाबत खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार संबंधित पुरवठाधारकाचा खुलासा प्राप्त झालेला आहे. या खुलाशानुसार घरपोच आहार हा मानवी हस्तक्षेप विरहीत मशीनद्वारे तयार केला जातो तसेच सदर माल तयार झाल्यानंतर तो माल अंगणवाडीपर्यंत पोहचण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. हा माल फॅक्टरीतून अंगणवाडी पर्यंत पोहचण्याच्या कालावधीवरून पाकीटामध्ये आढळून आलेला प्राणी सदृश अवशेष कोरड्या स्वरूपात आढळून यायला पाहिजे होता. परंतू पाकीटामधील प्राण्याचे अवशेष ओल्या स्वरूपात असून तो एक ते दोन दिवसांपूर्वीच मृत झाला असावा असे वाटत आहे तसेच फुल्ली ऑटोमॅटीक मशिनद्वारे घरपोच आहार तयार झाल्यामुळे पाकीटामध्ये उंदीर किंवा त्यासदृश दिसणार्या वस्तूचे अस्तित्व राहणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने खुलास्यात म्हटले आहे.
या उत्तरावर सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपप्रश्न मांडला. हडपसर-पुणे प्रयोगशाळा आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई या सदर नमुना तपासणीकरता पाठविण्यात आला, परंतु या दोन्ही लॅबने आहार नमुना तपासणीसाठी का नाकारला हे कळले पाहिजे. ज्या शस्त्राने हत्या झाली ते शस्त्र सोडून बाकी शस्त्र तपासून झाले अशी गत या प्रकरणात झाली आहे त्यामुळे तपासणी नाकारणार्या लॅबची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उप्रश्नातून केली. या दोन्ही प्रयोगशाळेने सदरचा नमुना तपासणीसाठी का स्विकारला नाही याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोषण आहाराच्या ठेकेबाबत सूचना करताना लहान मुलांना हे पोषण आहार दिले जात असल्याने यामध्ये ब्रँडेड अशा कंपनीकडून पोषण आहार घेतले पाहिजे, अशी सूचना केली. जेणेकरून ब्रँडेड कंपनी स्वतःचे अस्तित्व लक्षात घेऊन दर्जेदार आहाराचा पुरवठा करू शकेल. यावर ना.आदिती तटकरे यांनी शासनाचे नियम व निकष पाळून या कामी ठेका दिला जात असल्याचे सांगितले पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचित केल्याप्रमाणे या संदर्भातील उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासित केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper