Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबरमध्ये पहिले विमान घेणार टेक ऑफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सद्यःस्थितीत 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पाहणीवेळी दिली. जगातील सर्वात जलद बॅग क्लेम सिस्टीम येथे विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिली.
या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिलाई, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे, उपायुक्त रश्मी नांदेडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सर्व मान्यवरांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतिपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांनी विशेषतः विमान प्रवाशांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधांचा आढावा घेतला.
येथील कामांची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रकल्पाच्या सद्य:स्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 10 जून 2022 रोजी सिडकोतर्फे एक हजार 160 हेक्टरच्या संपूर्ण जागेवर 100% प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती एनएमआयएएलला प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहे आणि सिडकोने भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी अंदाजे दोन हजार कोटी खर्च केले आहेत.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) या कंपनीने 29 मार्च 2022 रोजी प्रकल्पासाठी वित्तीय ताळेबंदी साध्य केली, ज्यामध्ये एसबीआयने या विमानतळाच्या टप्पा 1 आणि 2साठी 19 हजार 647 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्चापैकी 12 हजार 770 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिडकोतर्फे एक हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण ही विकासपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलाचे वाहतूक विमान सी-295द्वारे उद्घाटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर एसयू 30ने दोन लो पास केलेत तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस 320ने 29 डिसेंबर 2024 रोजी या विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
30 जून 2025पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती साधलेली आहे. सध्या जवळपास 13 हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत, तर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबरपूर्वी हे काम पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 1 आणि 2 टप्प्यामध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे. हे विमानतळ सप्टेंबर 2025मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे. या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आमच्या सरकारने ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. या संदर्भात पाठपुरावा सुरू असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आम्ही चर्चा करू. येथून पहिल्या विमान उड्डाणापूर्वी विमानतळाला‘दिबां’चे नाव दिले गेले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply