Breaking News

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडल्या जातात. तरी ते चित्रपट आपलं अस्तित्व दाखवत राहतात आणि त्यात एक महत्त्वाचा फंडा असतो, त्यातील गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी.अलबेला चित्रपट असाच भन्नाट आणि भारी. मा. भगवानदादा अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबर १९५१ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत हा चित्रपट दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील इंपिरियल चित्रपटगृह, मध्य मुंबईतील प्रभादेवी येथील किस्मत चित्रपटगृह इतरत्र प्रदर्शित झाला. त्याच्या प्रदर्शनास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांनी ग्रामोफोन, लाऊड स्पीकर, रेडिओ असं करत करत दूरचित्रवाणी, उपग्रह वाहिनी, मोबाईल रिंगटोन, यू ट्यूब असा बराच मोठा प्रवास केला आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीलाही नाचावे असं वाटावं असं या चित्रपटाचं गाण्याचा ठेका आहे. या चित्रपटातील मूळ गाण्याचे रिमिक्स आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीलाही ताल धरायला लावतील.
राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या गीतांना सी. रामचंद्र यांचे संगीत आहे. भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे (पार्श्वगायन लता मंगेशकर आणि अण्णा चितळकर अर्थात सी रामचंद्र), शोला जो भडके दिल मेरा धडके ( लता मंगेशकर आणि अण्णा चितळकर अर्थात सी. रामचंद्र), धीरेसे आजा रे अखियन मे (लता मंगेशकर), शाम ढले खिडकी तले (लता मंगेशकर आणि अण्णा चितळकर), बलमा बडा नादान रे (लता मंगेशकर), दीवाना आ गया (लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी), तेरी याद ने मारा ( लता मंगेशकर आणि अण्णा चितळकर), किस्मत की हवा कभी गरम कभी नरम (अण्णा चितळकर) ही या चित्रपटातील गाणी अफाट लोकप्रिय झाली. यातील शोला जो भडके दिल मेरा धडके, ये दीवाना ये परवाना ही गाणी क्लब अथवा कॅब्रे शैलीतील आहेत असे जणू प्रमाणपत्र या गाण्यांना दिले गेले. या गाण्यात संगीतकार सी. रामचंद्र यांनी बोगाडूम, ओबो, क्लैरिनेट, तुरही, सेक्साफोन या वाद्यांचा भरभरून वापर केला गेला. सहज ताल धरायला लावतील अशी ही गाणी लहान मोठ्या पार्ट्या, वाढदिवसाचा सोहळा यात झालेच पण गोकुळाष्टमीतील गोविंदा आला रे आलाची धूम, श्रीगणेश विसर्जन मिरवणूक यातील कच्चीबाजावर ही गाणी हमखास वाजवणार. ताशा असो, ढोल असो, कोंबडी बाजा असो असं करत करत डीजेचे युग आले तरीही त्यात भोली सुरत दिल के खोटे, शाम ढले खिडकी तले ही गाणी हमखास वाजवणार आणि त्यावर मागची आणि आजची पिढी तल्लीन होऊन
बेभान नाचणारच.
आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट, त्याचे गीत संगीत नृत्य आणि तोच जर कथेचा भाग असेल अथवा गाण्याच्या माध्यमातून पटकथा पुढे सरकत असेल तर रसिक त्यात गुंतून, गुरफटून जाणारच. जुन्या काळातील चित्रपटांची ती मोठीच ताकद
आणि ओळख.‌‘अलबेला‌’ निमिर्तीच्या मागची एक बॅक स्टोरी सांगितली जाते. भगवानदादा आपल्या विशिष्ट शैलीत नायक रंगवत असताना त्यांनी गुनहगार (१९३९) या चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. त्या काळानुसार त्यांनी मसाला मिक्स चित्रपट निर्माण केले. त्यात एक साधीशी कथा, गीत संगीत नृत्य, ढिश्यूम ढिश्यूम गोष्ट, केवढे तरी योगायोग असं सगळं जमवून आणत. बदला (१९४३), बहादूर प्रताप (१९४५), मतवाले (१९४७), भेंडी बंगला (१९४८), भोले भाले (१९५०) अशी त्यांची नायक आणि दिग्दर्शक अशी वाटचाल सुरू झाली. मध्यम बजेटचे चित्रपट ही त्यांची खासियत. या चित्रपटाना स्टंटपट असं म्हणत आणि मुंबईत हे चित्रपट दक्षिण मध्य मुंबईतील ग्रॅण्ड रोड परिसरातील ताज, निशात, ऑल्फ्रेड, न्यू रोशन अशा चित्रपटगृहात प्रदर्शित होत, मुंबईत इतरत्र, तसेच अन्य शहरांमध्येही या चित्रपटाना बी अथवा सी दर्जाच्या चित्रपटगृहात जागा मिळे. तात्पर्य, या चित्रपटाना मुख्य प्रवाहात स्थान मिळत नव्हते. एका फिल्मी पार्टीत शोमन राज कपूर आणि भगवानदादा यांची भेट झाली. राज कपूरचे आपलं एक व्यक्तिमत्व आणि साम्राज्य असले तरी भगवानदादाचीही आपल्या खासियत होती. राज कपूरने या भेटीत भगवानदादा यांना सांगितले, मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल असा चित्रपट बनवा. किती काळ तुम्ही छोट्या छोट्या चित्रपटाच्या जगात वावरणार? भगवानदादानी राज कपूरचा ‘मोलाचा सल्ला’ ऐकला. नायिका म्हणून गीता बालीला करारबद्ध केले आणि दोघांनीही मनसोक्त मनमुराद नृत्य करत ‘अलबेला’मधील गाण्यात मनोरंजनाचा रंग भरला. हा फिल्मी किस्सा प्रसिद्ध आहे.
‘अलबेला’च्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होताच त्यातील गाणी रेडिओ, लाऊड स्पीकर, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्स, वाद्यवृंद अशी सगळीकडे ऐकू येत गेली आणि मग ९ सप्टेंबर १९५१ रोजी मुंबईतील इंपिरियल चित्रपटगृह आणि इतरत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला…, पण चित्रपट रसिकांकडून या चित्रपटाचे चक्क थंड स्वागत झाले. भगवानदादाना हा सांस्कृतिक धक्काच होता. त्या काळातील काही फिल्मवाले चित्रपटगृहाला भेट देऊन आपल्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे अतिशय उत्सुकतेने जाणून घेत. पहिल्या आठवड्यात फारसं यश प्राप्त झाले नाही. दुसरा आठवडाही जेमतेम बरा गेला. चित्रपट सुरू होताच भगवानदादा इंपिरियल चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलबाहेर येवून आतल्या पब्लिक रिस्पॉन्सचा कानोसा घेत. आणि…. तिसऱ्या आठवड्यापासून पिक्चर क्लिक झालं, पडद्यावर गाणे सुरू होताच पब्लिकही ताल धरे, शिट्ट्या वाजत, भोली सुरत दिल के खोटे पडद्यावर सुरू होताच काही पब्लिक पडद्यावर चिल्लर पैसे उडवत, काहीजण पडद्यासमोर नाचत आणि पिक्चर असं काही सुपर डुपर हिट ठरले की इंपिरियल चित्रपटगृहात पंचवीस आठवड्याचा मुक्काम केला. भगवानदादा स्टार झाले.पहिला डान्सर हिरो अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. भरपूर आर्थिक लाभ झाला, पण त्यानंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या झमेला, रंगिला (१९५४) वगैरे वगैरे चित्रपटांना रसिकांनी नाकारले. भगवानदादा यांची आर्थिक घसरण झाली. त्याचीही बरीच चर्चा होत असते. साठच्या दशकात अधेमधे रिपीट रनला ‘अलबेला‌’ प्रदर्शित होत असे.
सत्तरच्या दशकात १९७५ साली रणजीत बुधकर यांनी आपल्या चित्र खजिना या चित्रपट वितरण संस्थेच्या वतीने मुंबई वितरण विभागात ‘अलबेला’ पुन्हा प्रदर्शित केला. त्यांनी मुंबईतील रस्त्यांवर या चित्रपटाची पोस्टर्स मोठ्या प्रमाणावर लावली आणि कुठे मॅटीनी शो, कुठे नियमित तीन खेळ असा एकेक आठवड्यांसाठी हा चित्रपट प्रदर्शित करायचा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला आणि जवळपास पंचवीस वर्षांचा झालेला आणि आता पुढची पिढी वयात आली असताना यातील गाण्यांच्या लोकप्रियतेवर ‘अलबेला’ पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागला. चित्रपटातील सुमधुर गाणी त्या चित्रपटाला सतत पुढील पिढीत नेत असते. भगवानदादा यांची नाचता नाचता खांदे उडवण्याची शैली भारी लोकप्रिय झाली. मला आठवतंय आमच्या गिरगावातील श्री गणेशोत्सव आणि अन्य सणांमध्ये गल्ली चित्रपटात ‘अलबेला’ दाखवत. चित्रपट पूर्ण झाल्यावर प्रोजेक्शनवर भोली सुरत दिल के खोटे चढवले जाई आणि पडद्यावर गाणे सुरू होताच पडद्यासमोर नाचायला सुरुवात होई. भारी मजा येई. रिपीट रनला या चित्रपटात भरभरून कमाई केली अशी चित्रपट क्षेत्रातील आर्थिक सत्ता असलेल्या नाझ चित्रपटगृह इमारतीत म्हटले जाई. कालांतराने अलबेला चित्रपटाला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म्हणजे २०११ साली जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांनी इंपिरियल चित्रपटगृहात या चित्रपटाच्या खास खेळाचे आयोजन केले आणि तो संपल्यावर जवळच्याच एका हॉलमध्ये मनसोक्त भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत देत गप्पा यांचे खास आयोजन केले. चित्रपटावरचे बेहद्द प्रेम म्हणतात ते हेच. याच प्रेमाने आपल्या देशात अगदी खालच्या माणसापर्यंत मनोरंजक चित्रपट पोहचला आणि त्याच मास अपिलने चित्रपट माध्यम आणि व्यवसाय जिवंत ठेवला.
निर्माते मोनिष बाबरे यांनी भगवानदादा यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा शेखर सरताडेल दिग्दर्शित एक अलबेला (२०१६) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची पटकथा शेखर सरताडेल आणि अमोल शेटगे यांची आहे. मंगेश देसाई यांनी भगवानदादा साकारण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आणि त्या कर्तबगार व्यक्तिमत्वाला न्याय दिला. त्याला समिक्षक आणि रसिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. विद्या बालनने तेवढ्याच ताकदीने आणि उत्साहाने गीता बाली साकारली. विद्या बालन मराठी चित्रपटात भूमिका साकारणार ही ब्रेकिंग न्यूज गाजली. या दोघांनी ‘अलबेला’ मधील भोली सुरत दिल के खोटे, शाम ढले खिडकी तले वगैरे गाण्यात भगवानदादाची नृत्य शैली मस्त साकारली. दिग्दर्शक अनुराग बासू यांनी आपल्या लुडो (२०२०) या चित्रपटात याच चित्रपटातील किस्मत की हवा कभी गरम कभी नरम या गाण्याचा अगदी कल्पकतेने वापर केला. श्रेयनामावली आणि क्लायमॅक्सला या गाण्याच्या ट्यूनचा वापर केला, चित्रपटात अधेमधेही ते वापरले. सुरुवातीला मूळ गाण्याचा छोटासा व्हिडिओही वापरला. अलबेला चित्रपटाच्या पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एखाद्या भव्य दिव्य दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात या चित्रपटातील गीत संगीत नृत्य साकारत दाद द्यायला हवी. काही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कितीही जुन्या काळातील असल्या तरी कायमच आपल्या सोबत असतात. ‌‘अलबेला‌’ असाच आहे.

  • दिलीप ठाकूर – चित्रपट समीक्षक
  •   –  

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply