पनवेल : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवारी (दि. 14) करण्यात आले. त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध उपक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्रारंभी सकाळी साडेसात वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिकेचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तीन चित्ररथ तयार करण्यात आले होते. मिरवणुकीचा समारोप डॉ. आंबेडकर भवनाजवळ करण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यक्रम भवनात झाला.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणि राज्यघटना जपण्यास पनवेल महापालिका सज्ज आहे व याचा सर्वांना अभिमान आहे, असे सांगून महापालिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या मिरवणुकीचे व विविध स्पर्धांचे विशेष कौतुक केले.
डॉ. आंबेडकर भवनात झालेल्या कार्यक्रमास विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक-नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विविध संस्थांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांनी समारोप करून आभार मानले.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper