Breaking News

फसव्या राज्य सरकारला उघडे पाडणार

भाजपचा निर्धार; राज्य कार्यकारिणी अधिवेशनास प्रारंभ

नवी मुंबई : बातमीदार
राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडी सरकारने जनतेची घोर फसवणूक चालविली आहे. या फसवणुकीच्या विरोधात राज्यभर जनजागृती करून या फसव्या सरकारला उघडे पाडणार असल्याचे माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते विनोद तावडे यांनी शनिवारी (दि. 15) नवी मुंबईत स्पष्ट केले. नेरूळ येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भाजपचे राज्य कार्यकारिणी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अंगतथ प्रदेश कार्यसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते.
या पत्रकार परिषदेला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न व जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्ष जनतेत जाईल व जनजागृती करेल असा निर्धार राजकीय ठरावाद्वारे करण्यात आला असल्याचे या वेळी तावडे यांनी सांगितले.
राज्यातील महाआघाडीच्या सरकारने पूर्वीच्या फडणवीस सरकारचे सर्व लोकोपयोगी निर्णय असूयेपोटी रद्द केले आहेत. त्यामध्ये दुष्काळी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार व वॉटर ग्रीड या महत्त्वाच्या योजनांचाही समावेश आहे. या महाआघाडी सरकारने कर्जमाफीचे निकष बदलून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे, तर महानगरातील झोपडपट्टीवासीयांना 500 चौ.फुटाचे घर देण्याचे आश्वासन दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र ते पाळलेले नाही. महाआघाडी सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. शिक्षकांच्या बदल्या आणि सातबारा उतारे हे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून ऑनलाईन करण्यात आले होते, मात्र या सरकारने ते ऑफलाईन केले. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावेल असे सांगून आपला कोणताही शब्द पाळायचाच नाही असे या सरकारचे धोरण असल्याने यांच्या कारभाराचा फटका अवघ्या तीन महिन्यातच जनतेला बसू लागल्याचे तावडे म्हणाले.
या वेळी तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. त्यांना शहरी नक्षलवादाबद्दल सहानुभूती वाटत आहे, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोर्टात सरकारची नाचक्की होईल, हे ओळखत भीमा कोरेगावचा तपास एनआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या व प्रकल्प होणार नाही, असे संगितले, मात्र शिवसेना नेते एकनाश शिंदे यांनी आता अ‍ॅग्रिमेंटवर सह्या झाल्या आहेत, असे म्हटल्याने आता मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणार हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात होणार्‍या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली असून, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील व जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वात नवी मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
भाजपच्या राज्य परिषदेचे अधिवेशन उद्या होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून 10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी व अन्य सर्व पदाधिकारी त्यामध्ये सहभागी असतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे अधिवेशनाचे उद्घाटन करणार असून, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिवेशनाचा समारोप करतील, अशी माहिती तावडे यांनी दिली. या अधिवेशनात नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचे अध्यक्षीय भाषणदेखील त्याच वेळेस होईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply