Breaking News

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांनी सर्व चारही प्रभाग समित्यांवर विजय मिळवत महापालिकेवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पीठासीन अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
१० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर नियमानुसार ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती ‌‘अ‌’मधून भाजप महायुतीचे रवींद्र भगत १३ मते मिळवून विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी योगिता फडके यांना अवघी चार मते पडली. प्रभाग समिती ‌‘ब‌’मधून मधू पाटील आणि प्रभाग समिती ‌‘क‌’मधून रवींद्र जोशी यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर प्रभाग समिती ‌‘ड‌’साठी झालेल्या मतदानात अजय बहिरा यांनी १९ मते मिळवत विजय मिळवला, तर प्रतिस्पर्धी मनिषा म्हात्रे यांना फक्त तीन मते पडली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित करताच परिसरात भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान नवनिर्वाचित सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Check Also

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …

Leave a Reply