Breaking News

पनवेलमधील दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नवीन पनवेल सेक्टर 12 येथील दिलीप देसले हेदेखील मयत झाले. बुधवारी (दि.23) सायंकाळी त्यांचे पार्थिव पनवेलमध्ये आणण्यात आले. त्या वेळी देसले कुटुंबीयांनी टाफो फोडला होता. अंत्यविधीवेळी राज्याचे मंत्री दादा भुसे, आमदार प्रशांत ठाकूर, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कामोठे येथील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीकठाक आहे.
या घटनेची माहिती मिळताच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहीद दिलीप देसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली. तसेच, जखमी सुबोध पाटील आणि माणिक पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
प्राप्त माहितीनुसार, पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेसाठी पर्यटक रवाना झाले होते. 21 ते 30 एप्रिल या दरम्यान ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात्रेकरू पहलगाम येथे पोहचल्यानंतर मंगळवारी अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी प्रवाशांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दिलीप देसले यांचा मृत्यू झाला, तर माणिक पाटील आणि सुबोध पाटील हे जखमी झाले. माणिक पाटील या कस्टम विभागात कार्यरत होत्या आणि नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या होत्या.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यामुळे पहलगाम येथे काही पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी श्रीनगर येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मदतीसाठी 010194- 2463651 / 2457543 / 2483651 7780805144 / 7780938397 / 7006058623 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील जे नागरिक पहलगाम येथे अडकले आहेत किंवा ज्यांच्या नातेवाईक तिथे आहेत, त्यांनी तात्काळ रायगड जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी केले आहे. यासाठी 02141-222118/222097 आणि 8275152363, 9763646326 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोदी येथील स्मशानभूमीत दिलीप देसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, धनराज विसपुते, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, रामदास शेवाळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा चटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, संदीप पाटील, तेजस कांडपिळे, सरपंच प्रमोद भिंगारकर, जगदीश घरत, सुनील घरत, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल शहर अध्यक्ष दशरथ म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, भीमराव पोवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर,दीपक पवार, आर.डी. निकम, किशोर चौतमोल, अभिषेक भोपी, पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, रूपेश नागवेकर, गौरव कांडपिळे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनीही दिलीप देसले यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेमुळे पनवेल शहरावर शोककळा पसरली आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply