हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक राज खोसला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक अष्टपैलू दिग्दर्शक. 31 मे 1935 ही त्यांची जन्म तारीख. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सी.आय.डी., मेरा गाव मेरा देश, बम्बई का बाबू या चित्रपटांच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या काळातील चित्रपट रसिकांना ही एक उत्तम पर्वणी आहेच, शिवाय आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीलाही यानिमित्त हे जुने चित्रपट पहायची संधी आहे. मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणार्यांना राज खोसला दिग्दर्शित चित्रपटांतून बरेच काही शिकता येईल.
यानिमित्त अॅम्बोरिश रॉयचौधरी लिखित राज खोसला यांची बायोग्राफी प्रकाशित होत असून ती चित्रपटसृष्टी, सिनेपत्रकार व चित्रपट रसिकांसाठी माहिती व मनोरंजनाचा खूपच मोठा खजिना ठरावा. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट काळापासून चित्रपटसृष्टी कशी बदलत बदलत गेली, तेथील दृष्टिकोन व मानसिकतेत कसे बदल होत गेले, कलेसाठी कला ते व्यवसायासाठी कला हा प्रवास यातील अनेक गोष्टी, माहिती, संदर्भ, तपशील, आठवणी या पुस्तकात नक्कीच वाचायला मिळतील.
राज खोसला हे दिग्दर्शक एकच, पण थीममध्ये केवढी तरी विविधता दाखवलेला असा व्हीजन असलेला अस्सल फिल्मवाला. क्राईम (सी.आय.डी., काला पानी, शरीफ बदमाश), सस्पेन्स थ्रीलर (मेरा साया, वो कौन थी), सामाजिक (सोलवा साल, बम्बई का बाबू), गूढ (अनिता), कौटुंबिक नाट्य (दो रास्ते), डाकूपट (मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे, मेरा दोस्त मेरा दुश्मन), प्रेम त्रिकोण (प्रेम कहानी), नाट्यमय (मै तुलसी तेरे आंगन की), अॅक्शनपॅक्ड (नेहले पे देहला, दोस्ताना) वगैरे अनेक चित्रपट… आणि हे सगळे पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक एकच, तो म्हणजे राज खोसला. (जन्म 31 मे 1935. लुथियाना, पंजाब) आणि याच वाटचालीत त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक असलेले प्रमोद चक्रवर्ती, बप्पी सोनी हे कालांतराने स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कार्यरत झाले.
एखाद्याचे प्रगती पुस्तक अनेक गुणांनी भरलेले असावे तर हे असे. याचा अर्थ त्यांना लाल मार्क पडलाच नाही असे अजिबात नाही.
’चिराग’ फसला म्हणून पब्लिकने नाकारला. यानंतरच्या निर्माते प्रेमजी यांच्या कार्यालयातील मिटींगमध्ये अपयशाची स्थिती बघून आपल्या मानधनातील अर्धा वाटा सुनील दत्तने परत केला (हा फक्त किस्सा नाही, असे जंटलमन चित्रपटसृष्टीत होते. ते दिवसच वेगळे होते), राज खोसला यांनी या फ्लॉपमधून बाहेर पडण्यासाठी अल्पावधीत एक चित्रपट करायचे ठरवले. राजेश खन्ना अजून स्टार झाला नव्हता, एकेक चित्रपट स्वीकारत होता आणि मुमताजने ज्युनियर डान्सरपासून सहनायिका, नायिका असा प्रवास सुरू केला होता. प्रेम चोप्राला मोठा ब्रेक हवा होता, बिंदूचीही हीच गरज होती. राज खोसलानी यांना घेऊन बनवलेला ’दो रास्ते’ सुपर हिट ठरल्यावर ते पुन्हा फॉर्मात आले. (मुमताज तोपर्यंत सहनायिका म्हणून काम करत असल्यानेच शशी कपूरने तिला नायिका म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून ‘दो रास्ते’ राजेश खन्नाला मिळाला. मुमताज स्टार होताच शशी कपूरने ‘चोर मचाये शोर’साठी तिला नायिका म्हणून स्वीकारले.) कालांतराने राज खोसला यांचे दो प्रेमी, दासी, तेरी मांग सितारो से भर दू, मांटी मांगे खून, सनी, मेरा दोस्त मेरा दुश्मन, नकाब हे सगळेच चित्रपट फ्लॉप. राज खोसलासारख्या कल्पक दिग्दर्शकाचा फॉर्म असा अचानक जावा? चित्रपटाच्या जगात काहीही घडू शकते हेच खरे आणि त्या चढउतारात यशाचा आधार खूपच गरजेचा!
वूमन इन व्हाईट या कादंबरीवर आधारित ’नकाब’साठी त्यांनी विनोद खन्नाला निवडला आणि मेहबूब स्टुडिओतील सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित केले. विनोद खन्नाची ही सेकंड इनिंग होती आणि त्याने अनेक चित्रपट साईन केले. आता धावपळ होतेय म्हणून काही चित्रपट सोडलेही. त्यात ’नकाब’ सोडल्याने ऋषि कपूर आला. मग फराहच्या बेभरंवशाच्या वागण्याचे किस्से गाजले. विनोद खन्नाला ‘नकाब’मध्ये विशेष करण्यासाठी काही नाही असे वाटल्याने त्याने आजारपणाचे नाटक केले. आणि बरेच दिवस सेट तसाच सुनसान राहिला. त्याच्याऐवजी ऋषि कपूर आल्यावर पटकथेत काही बदल करण्यात आले. यात चित्रपट फसत गेला.
‘नकाब’ पूर्ण होताच पाली हिलवरील राज खोसलांच्या घरी जाऊन अगदी सविस्तर मुलाखत घेतली. लहानपणापासून आपण ज्यांचे चित्रपट कुठे गल्लीत, कुठे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये, कधी मॅटीनी शोला, कधी दूरदर्शनवर पिक्चर एन्जॉय केले अशा दिग्दर्शकाशी संवाद करताना त्यांच्या चित्रपटांच्या थीममधील विविधता आणि गाण्यांचे अप्रतिम टेकिंग यावर बरीच माहिती मिळाली. आपल्याला खरंतर गायकच बनायचे होते. मुंबईत आल्यावर माटुंगा येथे राहताना पं. जगन्नाथराव पुरोहित यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतले. जवळपास राहत असलेल्या कुंदनलाल सैगल यांच्याकडे गच्चीतील रियाझला तै हजरही राहत. तेव्हा त्यांनी दुसरा सैगल बनण्याचे स्वप्नही पाहिले. ऑल इंडिया रेडिओवर अनाऊन्सर म्हणून नोकरी करीत असतानाच स्टेशन डायरेक्टर झेड.ए. बुखारी यांच्यामुळे संधी मिळेल तेव्हा रेडिओवर गायनही केले. रैन बसेरा (1947) या चित्रपटातील एक गाणेही गायले, पण तशी संधी मिळाली नाही.
देव आनंदशी भेट झाल्याने गुरुदत्त यांच्याकडे ‘बाजी’पासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले (देव आनंद व राज खोसला हे मुळचे पंजाबच्या गुरदासपुरचे) आणि मग ‘जाल’ व ‘बाज’साठी गुरुदत्तकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर गुरुदत्त फिल्म्सच्या ’मिलाप’ (1955) पासून स्वतंत्रपणे दिग्दर्शन सुरु केल्यावर गीत संगीत व नृत्य याला कायमच पसंती दिली असे अतिशय मोकळेपणाने राज खोसला यांनी सांगितले. गीत संगीतावर विशेष प्रेम म्हणून आपल्या दिग्दर्शनातील ‘दो रास्ते’मध्ये तबकडीवर (ग्रामोफोन) एक बंगला बने न्यारा हे सैगलचे गाणे लावले, तर आपल्याच ‘प्रेम कहानी’साठी ते यू तो हमने दिल के सफर मे देखे है दिलदार बहुत असे गुणगुणले. पडद्यावर ते राजेश खन्नाने साकारले.
गाण्यांच्या टेकिंगसाठी त्यांचे अनेक चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहिल्याचे सांगताच राज खोसला खुलले. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, यह है बम्बई मेरी जान, आँखो ही आँखो मे (सी.आय.डी.), हम बेखुदी मे तुमको, अच्छा जी मै हारी, नजर ना लागे (काला पानी), साथी ना कोई मंझिल, दीवाना मस्ताना हुआ दिल, देखने मे भोला है (बम्बई का बाबू), लग जा गले फिरसे, जो हमने दास्ता अपनी सुनाई, नैना बरसे रिमझिम रिमझिम, शोख नजर की बिजलीया (वह कौन थी), आप के पहलू मे आकर, नैनो मे बदरा छाये, तू जहा जहा चलेगा (मेरा साया), तुम बिन जीवन कैसे बिता (अनिता), तेरी आँखे के सिवा (चिराग), यह रेश्मी झुल्फे, बिंदीया चमकेगी, खिजा के फूल (दो रास्ते), मार दिया जाए, (मेरा गाव मेरा देश), प्रेम कहानी मे एक लडका होता है, फूल आहिस्ता फेको, चल दरिया मे डूब जाए (प्रेम कहानी), हाय हाय एक लडका मुझको खत लिखता है (कच्चे धागे), जाने क्या बात है, मेरी याद आयेगी आती रहेगी, और क्या अहदे वफा (सनी)… गीत संगीताचा जबरदस्त खजिना. प्रत्येक गाण्याचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण डोळ्यासमोर येते हे राज खोसलांचे मोठेच यश. ग.रा. कामत हे त्यांचे हुकमी पटकथाकार. ’दोस्ताना’ सलिम जावेद लिखित होता, तर दो रास्ते आणि मै तुलसी तेरे आंगन की हे चित्रपट चंद्रकांत काकोडकर यांच्या मराठीतील कादंबरीवर आधारीत. त्यामुळेच कथानाट्य अस्सल व प्रभावी. कालांतराने राज खोसला यांचे सगळेच गणित बिघडले तरी ’सनी’मधील गाण्यात खोसला टच दिसला. ’जाने क्या बात है’ असा गाण्याचा मुखडा परफेक्ट ठरला. मुळात राज खोसला यांना संगीताची विशेष आवड होती, गायक बनण्याची इच्छा होती. म्हणून त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गीत संगीत व नृत्य कायमच दर्जेदार राहिले. असे राज खोसला शूटिंगच्या वेळेस लंच ब्रेकनंतर हमखास अर्धा तास झोपणार हे जणू ठरलेलेच.
अशा राज खोसला यांच्या निधनाचे वृत्त (9 जून 1991) पीटीआयने दिले तेव्हा मी ‘नवशक्ती’च्या कार्यालयात होतो आणि संपूर्ण मुंबई, ठाणे जिल्ह्यात अक्षरश: मुसळधार पाऊस पडत होता आणि त्याच्या बातम्यांना बरीच स्पेस मिळणार हे स्पष्ट होते, पण राज खोसलाचे चित्रपटसृष्टीसाठीचे कॉन्ट्रीब्यूशन पाहता ही पहिल्या पानावरची बातमी होती… राज खोसला म्हणताच त्यांच्या दिग्दर्शनातील विविधता आणि लोकप्रिय गाणी आठवायला हवीतच.
राज खोसला यांचे हिंदी चित्रपटसृष्टीला बरेच काही देणे आहे. राज खोसलांच्या कर्तबगारीचे आणखी कौतुक व्हायला हवे होते हे निश्चित. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’( 1975)चे पन्नासावे वर्ष साजरे होत आहे. या शोलेची काही मुळे राज खोसला दिग्दर्शित मेरा गाव मेरा देश या चित्रपटात असल्याचे म्हटले जाते हेदेखील राज खोसला यांचे यशच. चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत राज खोसला यांचे पर्व वैशिष्ट्यपूर्ण.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper