लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून एक कोटींची भरीव मदत जाहीर
खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर येथील इस्कॉन मंदिरात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक, भावनिक व आध्यात्मिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट आणि कृष्णा संजीवनी द डिव्हाईन म्युझिक या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी (दि.३०) करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सेवाभावी उपक्रमासाठी एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल जिष्णू देव वर्मा, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, इस्कॉन नवी मुंबईचे मंदिर अध्यक्ष डॉ. सूर दास, भक्तिवेदांत कॉलेजचे संचालक डॉ. व्ही.सेवक दास, कॅल्विन सेउंगवॉन यी, जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे, डॉ. विक्रम गोटा, डॉ. अमित जोशी, डॉ. रजनीश कामत, डॉ. अविनाश टिप्पणी आदी उपस्थित होते.
होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट अंतर्गत आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत योग, ध्यान, संगीत उपचार, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सकारात्मक जीवनशैली यांचा समन्वय साधून रुग्णांना सर्वांगीण आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, तर कृष्णा संजीवनी द डिव्हाईन म्युझिक उपक्रमाद्वारे भक्तिमय संगीताच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य आणि अंतर्मनातील शांतता वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्याला बळ मिळावे आणि अधिकाधिक रुग्णांपर्यंत या सेवेचा लाभ पोहचावा यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक बळही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper