सिडको रिकाम्या हाती माघारी; आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उलवे नोडमधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे सोमवारी (दि. 26) रिकाम्या हाती परतावे लागले. पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचावासाठी जनआंदोलन उभारले. विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत. या आंदोलनालाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही, मात्र यापुढे कारवाई केल्यास आम्हीही तयार आहोत, असा इशारा सिडकोला देण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी स्मशानभूमीत पार्थिव जळत असताना त्या ठिकाणी सिडकोच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला. आजचा हा आवाज इशारा आहे, पुन्हा कारवाई करायला याल, तर दोन्ही तालुक्यातील लोकांचे जनआंदोलन उभारू, असा सज्जड दम त्यांनी सिडकोला दिला. जर सिडको पुन्हा असेच निर्णय घेत राहिली आणि जनतेच्या भावनांचा विचार केला नाही, तर सिडकोला रौद्र रोषाला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगत ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी कुठलीही पर्वा करणार नसल्याचे स्पष्ट केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, सिडकोने केवळ न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून ही वेळ आली आहे. एखादी कारवाई करायची असेल, तर नोटीस द्यावी लागते. कोर्टाने अशी कोणतीही मुदत दिली नाही. स्मशानभूमी परंपरागत आहे. या ठिकाणी स्मशानभूमी आधी वसलेली आहे, नंतर कॉलनी बनली आहे. त्यामुळे मूळची व्यवस्था तशीच राहिली पाहिजे. कॉलनीवाल्यांना त्रास होऊ नये याची जबाबदारी सिडकोने घ्यायची आहे. हे सगळे न करता आपल्याला उखडून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आज स्मशानभूमीच्या जागेवर डोळा असून उद्या म्हणतील गावातील इतर सार्वजनिक सुविधादेखील हटवा आणि तिथे स्विमिंग पूल किंवा इतर प्रकल्प उभे करा. सिडकोची ही मनमानी आणि जनतेविरोधी भूमिका खपवून घेतली जाणार नाही. सिडकोचा मनमर्जी कारभार सुरू आहे. तो चालू द्यायचा नाही.
पनवेल तालुक्यातील अनेक रहदारीच्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत. त्यांचा त्रास कोणालाही होत नाही, मात्र कोपर गावातील स्मशानभूमीचा त्रास सिडकोला होतोय. त्यामुळे सिडकोच्या डोक्यावर आपल्याला बसावे लागेल. सर्वांनी यासाठी जागरूक राहा. हे युद्ध आहे, पावसात भिजलो हे सांगून चालणार नाही. आपल्याला आता आरपारची लढाई करायची आहे. जे सिडकोचे अधिकारी जाणीवपूर्वक ग्रामस्थ आणि कॉलनीमधील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करून वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचा जाब आपल्याला लवकरच विचारायचा आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही तालुक्यातील नागरिकांना एकत्रित घेऊन जसे दि.बा. पाटीलसाहेबांनी आंदोलन पेटवले होते तसेच आंदोलन आपल्याला करावे लागेल. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हिताचे काम करीत आहे, पण हे सिडकोचे अधिकारी दिखावेगिरी करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आमचा लढा कायम राहणार आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोला ठणकावून सांगितले.
जनआंदोलनाचा भडका बघता या वेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली. त्या अनुषंगाने सिडकोच्या अधिकार्यांसोबत उलवे पोलीस ठाण्यात बैठक झाली. या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. नेऊल, सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर आदींसह आंदोलकही उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडको अधिकार्यांची झाडाझडती घेतली. स्मशानभूमी पूर्वापार आणि दोनशे वर्षांचा इतिहास असलेली आहे. विशेष म्हणजे ती सिडकोची नसून ग्रामपंचायतीची आहे. सिडकोने ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही. त्यामुळे काही सोसायट्यांच्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्याचा प्रयत्न सिडकोकडून करण्यात येत होता. या कारवाईच्या अनुषंगाने सिडको आणि त्यांच्या अधिकार्यांच्या भूमिकेबद्दल संशयाचा धूर पसरला आहे. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या हयात गेलेल्या येथील ग्रामस्थ आंदोलकांनी सिडको आणि सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांचा घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना म्हटले की, लोकनेते दि.बा. पाटील, जनार्दन भगतसाहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढे, आंदोलने उभारली गेली. सिडकोने स्वतःहून गावांना काही दिले नाही. लढा आणि सततचा पाठपुरावा करायला लागतो तेव्हा एखाद्या विषयात सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मनावर घेते. सुविधा देण्याचे लांब, पण ग्रामस्थांच्या हक्कांना छेद देण्याचे काम सिडको करीत आली आहे. या स्मशानभूमीला दोनशेपेक्षा जास्त वर्षे झाली असताना चार सोसायट्यांनी न्यायालयात तक्रार केली आणि सिडकोच्या अधिकार्यांनी न्यायालयात ग्रामस्थांची योग्य बाजू न मांडता चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिले असे असले तरी सिडकोने पुन्हा या विषयी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या पाहिजेत, असे सांगत पिढ्यान् पिढ्या अस्तित्वात असलेली स्मशानभूमी तोडून हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करू तेवढा कमी आहे.
न्यायालयाच्या आदेश आहे. मग ते आदेश काय आहेत याची ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना माहिती दिली का? तसेच तोडक कारवाईची कालमर्यादा निश्चित नसताना, ही स्मशानभूमी सिडकोच्या मालकीची नसताना सिडको का कारवाई करायला आली? तशी सूचना प्रथम ग्रामपंचायतीला का दिली नाही? सिडको ही स्मशानभूमी तोडण्यासाठी का हातघाई करत आहे, असे प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारले असता आणि तोडक कारवाईवर जाब विचारला असता अधिकारी भरत ठाकूर निरूत्तर झाले. भरत ठाकूर यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, कारण हे सिडकोचे अधिकारी चर्चेच्या लायकीचे नाहीत. त्यामुळे आमची चर्चा फक्त सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसोबतच होईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर अधिकार्यांनी वरिष्ठांना संपर्क करून एमडींसोबत बैठक घेण्याचे आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, सी.एल. ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र घरत, गव्हाणच्या माजी सरपंच माई भोईर, विभागीय अध्यक्ष विजय घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, शैलेश भगत, निलेश खारकर, सचिन म्हात्रे, किशोर पाटील, अरुणशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गावाच्या हितासाठी आंदोलकांचा प्रण
दरम्यान, कोपर येथील ज्येष्ठ नागरिक वसंत पाटील यांच्या पत्नी यमुना यांचे रविवारी निधन झाले आणि सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होते. गावावर शोककळा पसरली असताना सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर हे पथक घेऊन या स्मशानभूमीच्या तोडक कारवाईसाठी पहाटेच आले. याद्वारे सिडकोने निर्लज्जपणाचा कळस करत मग्रुरी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी स्मशानभूमीत ठिय्या मांडला. एका बाजूला पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते, तर दुसरीकडे सिडकोबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. घरातील व्यक्ती मयत झाला तरी या वेळी दुःख बाजूला करून स्मशानभूमी आणि गावाच्या हितासाठी आंदोलकांनी प्रण केला. काहीही होवो, पण स्मशानभूमीवर तोडक कारवाई करून देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यामध्ये महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
सिडकोने केली न्यायालयाची दिशाभूल
कोपर येथील स्मशानभूमी 200 वर्षांहून जुनी आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ही स्मशानभूमी असून पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थ या स्मशानभूमीचा अंत्यसंस्कारासाठी उपयोग करतात. विशेषतः यावर सिडकोची मालकी नाही, मात्र हा भूखंड सिडकोला गिळंकृत करायचा आहे. म्हणूनच कोणतीही सखोल माहिती न घेता काही लोकांच्या तक्रारीवरून सिडकोने कोणतीही अधिकृत माहिती न देता न्यायालयाची दिशाभूल केली आहे. या ठिकाणी म्हणजे भूखंड क्र.176, सेक्टर 9 उलवे नोड येथे कार्यकारी अभियंता उलवे-2 यांच्या 14 सप्टेंबर 2020 पत्रानुसार या स्मशानभूमीचे काम करण्याकरिता अधिकृतरित्या निविदा काढून काम देण्यात आले होते. तसा उल्लेखही सोसायट्यांच्या तक्रारीमध्ये आहे. अधिकृतरित्या स्मशानभूमीकरीता निविदा काढलेली जागा अचानकपणे अनधिकृत कशी ठरली असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. याबाबत सोसायटी तसेच सिडकोमार्फतदेखील मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली आहे तसेच वर्षानुवर्षे ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत व अधिपत्याखाली स्मशानभूमी येते ती जागा ताब्यात घेण्यापूर्वी अथवा तेथील स्मशानभूमी स्थलांतरीत करावयाची असल्यास सिडको प्रशासनाला त्या ग्रामपंचायतीशी अथवा तेथील ग्रामस्थांशी चर्चा करावयाची किंवा पत्रव्यवहार करण्याची अजिबात आवश्यकता वाटली नाही हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. सिडकोने स्मशानभूमी परस्पररित्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय हा लोकशाही मूल्यांना धरून नसून प्रकल्पग्रस्तांच्या धार्मिक, सामाजिक व भावनिक भावना पायदळी तुडवणारा असल्याची चर्चा येथे सुरू होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper