माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून 100 टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत सध्या मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू केली असून या योजनेचा नागरीक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे थकीत मालमत्ता कर देखील जमा होण्यास मदत होत आहे. याच धार्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांकडून पाणी पट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठीदेखील अभय योजना लागू करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पाणी पट्टी करावरील ही शास्ती 100 टक्के माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिकेकडून अभय योजना लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून नागरीक वेळेत पाणी पट्टी बीले भरतील व पनवेल महानगरपालिकेस थकीत पाणी पट्टी कर जमा होण्यास मदत होईल व पनवेल महानगरपालिकेच्या उत्पन्नातदेखील भर पडेल.
या सर्व विषयाचे महत्वपूर्ण गांभिर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी अभय योजना लागू करून 100 टक्के शास्ती माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असेही माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper