भारतीय संघात होणार मोठे बदल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघामध्ये टी-20 वर्ल्डकपनंतर मोठे बदल केले जाणार असून रवी शास्त्री प्रशिक्षकपदापासून दूर होणार असल्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणार्या टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघापासून वेगळे होणार आहेत. या सर्वांचा करार टी-20 विश्वचषकापर्यंत आहे.
रवी शास्त्रींनी काही क्रिकेट मंडळाच्या सदस्यांना कळवले आहे की स्पर्धेनंतर जेव्हा त्यांचा करार संपेल तेव्हा ते राष्ट्रीय संघापासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, इतर काही सपोर्ट स्टाफ आयपीएल संघांशी आधीच चर्चा करीत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आता टीम इंडियासाठी नवीन सपोर्ट स्टाफ तयार करायचा आहे.
रवी शास्त्री हे पहिल्यांदा डायरेक्टर म्हणून 2014मध्ये भारतीय संघासोबत जोडले गेले होते. त्यांचा करार 2016पर्यंत होता. यानंतर अनिल कुंबळेंना एक वर्षासाठी प्रशिक्षक बनवण्यात आले. 2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर रवी शास्त्री भारतीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले. शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मालिका जिंकली आणि त्यानंतर गेल्या महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत खेळली.
गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गोलंदाजीमध्ये चांगले यश मिळवले आहे, तर आर. श्रीधरन यांनी भारताच्या क्षेत्ररक्षणात नवे बदल आणण्याचे काम केले आहे, मात्र हे सर्व असूनही भारताने आयसीसीचे एकही विजेतेपद पटकावले नाही.
2019च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला. यानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात म्हणजेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही हरला होता. दुसरीकडे आयसीसी स्पर्धा वगळता, गेल्या चार वर्षांत, शास्त्री आणि सहकार्यांसोबत भारताने वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप केले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील त्यांची कामगिरीही उत्कृष्ट होती.